अट्टल गुन्हेगारास देशीकट्टा, दोन जिवंत काडतुस सह अटक : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रे
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवैधरीत्या देशी कट्टा आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नौशाद शाहादतुल्ला कुरेशी (३२) रा. बँक ऑफ इंडियाच्या मागे घुग्घूस असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेले अवैध धंदे, अवैध हत्यार बाळगणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यावर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैधरीत्या हत्यार बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाईची मोहीम राबवित आहेत. या मोहिमेदरम्यान पडोली येथील डीएनआर कार्यालयामागे रेल्वे लाइनजवळ एक व्यक्ती आपल्या कमरेला देशीकट्टा लावून उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक भुरले हे पथकासह तत्काळ रवाना होऊन संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, त्याच्या कमरेला लागून असलेला एक देशी कट्टा तसेच त्याच्या पँटच्या खिशात देशी कट्ट्यात वापरण्यात येणारे दोन नग जिवंत काडतूस आढळून आले. त्याची अधिक चौकशी केली असता आरोपी नौशाद हा अट्टल गुन्हेगार असून, त्याच्यावर घुग्घूस, राजुरा, वरोरा पोलीस ठाण्यात अनेक चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. तसेच तो चोरी, घरफोडी आणि इतर गुन्ह्यांमध्ये विविध पोलीस ठाण्यांमध्ये फरार घोषित असल्याची माहिती पुढे आली. नौशाद शाहादतुल्ला कुरेशी याच्याविरूद्ध पडोली पोलीस ठाण्यात अवैधरीत्या शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधू यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात सपोनि बोबडे, सपोनि, नागेशकुमार चतरकर, सपोनि किशोर शेरकी, पोउपनि विनोद भूरले, पोहवा संजय आतफुलवार, नापोकॉ संतोष पेलपुलवार, पोकॉ गोपाल आतकुलवार, पोकॉ नितीन रायपुरे यांनी केली.
News - Chandrapur