महत्वाच्या बातम्या

 मानधनाविना सेवा देणाऱ्या पेसा बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांचा बिनपगारी कामबंद आंदोलनाचा इशारा


- चार महिन्यांपासून मानधन नाही; कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्या – पेसा आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / पेरमिली : भामरागड राज्यातील बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) पेसा पदभरतीमधील मानधनावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत बिनपगारी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मागील चार महिन्यांपासून मानधन अदा करण्यात आले नसल्याने कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी सेवा सुरू ठेवल्याचे कर्मचाऱ्यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

आरोग्य विभागाच्या १६ मे २०२३ रोजीच्या पदभरती जाहिरातीनुसार अंतिम गुणवत्तेत निवड झालेल्या उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे १० फेब्रुवारी २०२५ रोजी विशेष बाब म्हणून मानधन तत्त्वावर नियुक्त करण्यात आले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २ डिसेंबर २०२५ रोजी दिलेल्या अंतरिम आदेशात सदर भरती प्रक्रियेतील ५० टक्के जागा राखीव ठेवून उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य शासनाला निर्देश दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने ११ फेब्रुवारी २०२६ रोजी शासन निर्णय काढून पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.

मात्र, शासन निर्णय होऊनही अद्याप कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. त्यातच मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. वाढते पेट्रोल दर, रूम भाडे आणि ग्रामीण भागातील कठीण परिस्थितीमुळे सेवा बजावताना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.अत्यंत कठीण परिस्थितीतही आम्ही आरोग्य सेवा प्रामाणिकपणे दिली. मात्र आता मानधनाशिवाय सेवा देणे अशक्य झाले आहे. त्यामुळे आम्ही बिनपगारी कामबंद आंदोलन करत आहोत, अशी भूमिका आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

तसेच शासनाने तात्काळ निर्णय घेऊन मानधनावर कार्यरत सर्व बहुद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे व थकीत मानधन त्वरित अदा करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनात मयुर कोडापे, निखिल उसेंडी, लोकेश मडावी, लंकेश तुलावी व सुजीतकुमार आतला यांच्यासह अनेक कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos