महत्वाच्या बातम्या

 गरजू विद्यार्थिनींना शिक्षणाची नवी गती : रोटरी-रोट्रॅक्ट क्लबकडून ५० सायकलींचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : ग्रामीण व उपनगरी भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी रोटरी क्लब बल्लारपूर आणि रोट्रॅक्ट क्लब बल्लारपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ५० गरजू शालेय मुलींना मोफत सायकलींचे वितरण करण्यात आले. नगर परिषद गांधी विद्यालय, बल्लारपूर येथे आयोजित कार्यक्रमात विविध शाळांतील विद्यार्थिनींना सायकलींचा लाभ देण्यात आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून नगर परिषद बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ उपस्थित होते. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे अध्यक्ष निलेश चिमड्यालवार होते. विशेष अतिथी म्हणून राजू मुंधडा व असिस्टंट गव्हर्नर मनीष मूलचंदानी उपस्थित होते. 

विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागू नये आणि शिक्षणात सातत्य राखता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. यंदा जनता सिटी ब्रँच, सर्वोदय विद्यालय, नगर परिषद गांधी विद्यालय, जी.एन.पी.एस., साईबाबा कॉन्व्हेंट, के.जी.एन. कॉन्व्हेंट, आयडियल कॉन्व्हेंट तसेच विसापूर येथील चिंतामणी विद्यालयातील विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.

प्रमुख अतिथी विशाल वाघ यांनी विद्यार्थिनींना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत परिश्रम, शिस्त आणि नियमित अभ्यासाच्या बळावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणाऱ्या रोटरी क्लबच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.

अध्यक्षीय भाषणात निलेश चिमड्यालवार यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि समाजकल्याण क्षेत्रात रोटरी क्लब सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या सायकली त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

असिस्टंट गव्हर्नर मनीष मूलचंदानी यांनी मुलींच्या शिक्षणाला समाजाच्या प्रगतीचा पाया संबोधत विद्यार्थिनींनी आपल्या क्षमतेचा पूर्ण उपयोग करून कुटुंब व समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.

सायकली प्राप्त झालेल्या विद्यार्थिनींनी व त्यांच्या पालकांनी रोटरी व रोट्रॅक्ट क्लबचे आभार मानले. यापूर्वी शाळेत जाण्यासाठी लांब अंतर पायी पार करावे लागत होते, मात्र आता सायकलमुळे वेळेची बचत होऊन अभ्यासासाठी अधिक वेळ मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत दोंतुलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन हेमराज गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटरी व रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी क्लबचे पदाधिकारी, सदस्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून भविष्यातही अशा विद्यार्थीहिताच्या उपक्रमांना सातत्य देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos