गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून पुलाच्या बांधकामावरील वाहनांची जाळपोळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : काही काळ शांत असलेल्या नक्षलवाद्यांनी दक्षिण गडचिरोली भागात पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. गुरुवारी भामरागड तालुक्यातील तुमरकोठी येथील गाव पाटलाची हत्या केल्याची घटना ताजी असताना दुसऱ्या दिवशी शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास नक्षल्यांनी एटापल्ली तालुक्यात जाळपोळ केली.एटापल्ली तालुक्यातील गट्टा ते गट्टागुडा मार्गावर पुलाच्या बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे.
गट्टा ते गट्टागुडा मार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी असलेल्या वाहनांची नक्षल्यांनी रात्री १० च्या सुमारास जाळपोळ केली. यात मिक्सर मशीनचा समावेश आहे, तर काही वाहनांची तोडफोड केल्याची माहिती प्राप्त झाली. दरम्यान पोलीस सतर्क झाल्याने नक्षलवादी घटनास्थळावरून पसार झाले. हा परिसर अतिसंवेदनशील आहे. गेल्या वर्षभरापासून नक्षलवाद्यांच्या कारवाया कमी झाल्या होत्या. परंतु महिनाभरापासून नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाले असून प्रशासनाला धमकी देण्यासाठी पत्रकबाजीसारखे प्रकार दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा सावध झाली आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.
News - Gadchiroli