महत्वाच्या बातम्या

 आला पावसाळा आरोग्य सांभाळा : साथीच्या आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सज्ज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संसर्गजन्य, जलजन्य व डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग सज्ज असून, नागरिकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेची काळजी घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.

पावसाळ्यात दूषित पाणी, अस्वच्छ परिसर, साचलेले पाणी आणि बदलते हवामान यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, टायफॉईड, कावीळ, डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांनी पिण्यासाठी उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच वापरावे, ताजे व स्वच्छ अन्न सेवन करावे, वैयक्तिक स्वच्छता राखावी आणि परिसरात पाणी साचू देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपकेंद्रे आणि आरोग्य व कल्याण केंद्रांमध्ये आवश्यक औषधसाठा, ओआरएस, झिंक गोळ्या, ताप व संसर्गजन्य आजारांवरील औषधे, आवश्यक वैद्यकीय साहित्य तसेच प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात आले आहेत. संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला असून, प्रत्येक आरोग्य संस्थेला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जलजन्य व डासजन्य आजारांचे वेळेवर निदान व्हावे यासाठी संशयित रुग्णांची तात्काळ तपासणी, आवश्यक रक्तनमुने व पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गावपातळीवर आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका, आरोग्य कर्मचारी आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जनजागृती, घरभेटी, स्वच्छता अभियान तसेच ताप सर्वेक्षण नियमितपणे राबविण्यात येत आहे.

यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पावसाळ्यात साथीचे आजार प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय वेक्टरजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम (NVBDCP) अंतर्गत डेंग्यू, मलेरिया व चिकुनगुनिया प्रतिबंधात्मक उपाययोजना, जलगुणवत्ता तपासणी कार्यक्रम, क्षयरोग निर्मूलन अभियान  राबविण्यात येत आहे.

पावसाळ्याच्या काळात ग्रामपंचायती, नगरपरिषदा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वयाने स्वच्छता मोहीम, नाल्यांची साफसफाई, पाणी साचू न देणे, क्लोरीनेशन, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि डासांच्या उत्पत्तीस्थळांचे निर्मूलन यावर विशेष भर देण्यात येत आहे. शाळा, अंगणवाडी आणि सार्वजनिक ठिकाणी आरोग्यविषयक जनजागृती करून नागरिकांना प्रतिबंधात्मक उपायांचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

डॉ. नितीन कापसे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, प्रत्येकाने उकळलेले किंवा शुद्ध केलेले पाणीच प्यावे, हात साबणाने वारंवार धुवावेत, उघड्यावरचे अन्न टाळावे, घराच्या व परिसराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे, डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. ताप, जुलाब, उलट्या, अंगदुखी किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतः औषधोपचार न करता तात्काळ जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घ्यावेत. अफवांवर विश्वास न ठेवता आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

जिल्हा आरोग्य विभागाने नागरिकांच्या आरोग्य संरक्षणासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असून, कोणत्याही संभाव्य साथीच्या परिस्थितीला तातडीने प्रतिसाद देण्यासाठी नियंत्रण कक्ष, वैद्यकीय पथके आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करून स्वच्छ, निरोगी आणि रोगमुक्त भंडारा जिल्हा घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनह जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी केले.





  Print






News - Bhandara




Related Photos