आंतरराज्यीय ४७ गुन्ह्यांचा सराईत घरफोड्या जेरबंद : चंद्रपूर जिल्ह्यातील ९ गुन्हे उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत आंध्र प्रदेशातील एका सराईत आंतरराज्यीय घरफोड्या करणाऱ्या आरोपीला अटक करत चंद्रपूर जिल्ह्यातील सहा घरफोडी आणि तीन मोटारसायकल चोरीचे असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपीकडून सुमारे ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. चिन्नाबाबु व्यंकटेश्वरलु गोरेला ३२ वर्ष रा. राज मुंद्ररी (आंध्र प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार बल्लारपूर पोलीस ठाण्यात फिर्यादी रंजीता परमेश्वर सिंगाराव यांनी १९ मे रोजी घरफोडी झाल्याची तक्रार दिली होती. त्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा माग काढला. त्यानुसार आंध्र प्रदेशातील राजमहेंद्रवरम येथून आरोपी चिन्नाबाबु व्यंकटेश्वरलु गोरेला ३२ वर्ष याला ८ जुलै २०२६ रोजी ताब्यात घेण्यात आले.
तपासादरम्यान आरोपीने चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार बल्लारपूर, राजुरा, चंद्रपूर शहर आणि रामनगर पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असलेले एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी रेल्वेने विविध शहरांमध्ये प्रवास करून रेल्वे स्थानक परिसरातून मोटारसायकली चोरत असे.
त्याच वाहनांचा वापर करून बंद घरे हेरून घरफोड्या करत असे. चोरीनंतर मोटारसायकल पुन्हा रेल्वे स्थानकाजवळ सोडून रेल्वेने मूळ गावी परत जाण्याची त्याची कार्यपद्धती होती. तपास चुकविण्यासाठी तो कॅप, मास्क आणि कॉलेज बॅगचा वापर करत असल्याचेही उघड झाले आहे.
आरोपीविरुद्ध आंध्र प्रदेशातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये ४१ तर तेलंगणा राज्यात सहा असे एकूण ४७ घरफोडी व चोरीचे गुन्हे यापूर्वीच नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे तो सराईत आंतरराज्यीय गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या कारवाईत तीन दुचाकी, चांदीचे दागिने तसेच सुमारे ३ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपीने ते आंध्र प्रदेशातील गोल्ड कंपनीकडे विकल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे ४ लाख ६५ हजार रुपये आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी,अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे, उपनिरीक्षक विक्की लोखंडे सफौ स्वामीदास चालेकर, पो.हवा किशोर वैरागडे, अजय बागेसर, शरद कुडे, पोअं गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, चापोअं वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर तसेच पोहवा विकास जुमनाके, पोअं. वैभव गाडगे पोलीस ठाणे बल्लारपुर यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




