ड्युटी संपवून घरी परतताना पोलीस उपनिरीक्षकाचा भीषण अपघात : प्रकृती गंभीर, नागपुरात उपचार सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : वडसा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष रमेश मरस्कोल्हे ५६ वर्षे, रा. आरमोरी हे शनिवारी पहाटे ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतत असताना झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झाले. हा अपघात आरमोरी–वडसा मार्गावरील आरमोरीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वे पुलाजवळ सकाळी अंदाजे ५.३० वाजताच्या सुमारास घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, संबंधित यंत्रणेकडून तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक संतोष मरस्कोल्हे यांनी शनिवारी पहाटे ५.०० वाजेपर्यंत वडसा पोलीस ठाण्यात आपली नियमित ड्युटी पूर्ण केली. त्यानंतर ते दुचाकीने आपल्या मूळगावी आरमोरीकडे रवाना झाले. मात्र, आरमोरी–वडसा मार्गावरील रेल्वे पुलाजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात त्यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला की अचानक एखादा वन्य प्राणी समोर आल्याने किंवा दुचाकीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे अपघाताचे गूढ कायम असून, संबंधित यंत्रणेकडून सर्व शक्यतांचा तपास करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच मरस्कोल्हे यांच्या नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यांना ब्रह्मपुरी येथील आस्था हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी नागपूर येथील विशेष रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
कर्तव्य बजावून पहाटे घरी परतत असताना घडलेल्या या अपघातामुळे पोलीस विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतोष मरस्कोल्हे हे कर्तव्यदक्ष आणि मनमिळावू अधिकारी म्हणून परिचित असून, त्यांच्या अपघाताची बातमी समजताच सहकारी अधिकारी, कर्मचारी तसेच आरमोरी परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी आणि ते लवकर बरे होऊन सेवेत रुजू व्हावेत, अशी प्रार्थना सर्व स्तरातून केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




