महत्वाच्या बातम्या

 अहेरी मतदारसंघातील बालकांमधील अतिसाराच्या वाढत्या संकटाकडे आ. डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांचे विधानसभेत लक्षवेध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : पावसाळ्यात अहेरी विधानसभा मतदारसंघातील बालकांमध्ये वाढणाऱ्या अतिसार, उलट्या, ताप व दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांच्या गंभीर समस्येचा मुद्दा आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित करत शासनाचे लक्ष वेधले.

अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली आणि मुलचेरा हे दुर्गम, आदिवासीबहुल व जंगलव्याप्त तालुके असून, दरवर्षी पावसाळ्यात या भागातील बालकांना अतिसार व इतर संसर्गजन्य आजारांचा मोठा फटका बसतो. अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करावे लागते, तर काही दुर्दैवी घटनांमध्ये बालमृत्यूही होतात, अशी गंभीर बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

या परिस्थितीमागे पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित होणे, स्वच्छतेचा अभाव, दुर्गम गावांमध्ये आरोग्य सेवा वेळेत न पोहोचणे, कुपोषण, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची कमतरता तसेच पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात येणाऱ्या अडचणी ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिसार हा साधा आजार वाटत असला तरी लहान मुलांमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊन (निर्जलीकरण) काही तासांतच प्रकृती गंभीर होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि तातडीची वैद्यकीय सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे आमदार आत्राम यांनी स्पष्ट केले.

या समस्येवर प्रभावी नियंत्रणासाठी प्रत्येक गावात शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करणे, क्लोरीन गोळ्यांचे वाटप, पाणी शुद्धीकरणाबाबत जनजागृती, अंगणवाडी व आशा सेविकांमार्फत घरोघरी आरोग्य तपासणी, प्रत्येक आरोग्य उपकेंद्रात ORS व आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून देणे, दुर्गम भागात फिरते वैद्यकीय पथक तैनात करणे, बालकांचे लसीकरण, कुपोषित मुलांची विशेष काळजी घेणे, ग्रामपंचायत स्तरावर शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एटीएम वॉटर मशीन बसविणे आणि पाणीपुरवठ्याची नियमित तपासणी करणे अशा उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी त्यांनी केली.

अहेरी मतदारसंघातील प्रत्येक बालकाचा जीव अमूल्य असून, या प्रश्नाकडे केवळ आरोग्यविषयक समस्या म्हणून नव्हे तर मानवी जीवनाशी संबंधित अत्यंत गंभीर विषय म्हणून पाहण्याची गरज असल्याचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले. प्रशासकीय यंत्रणेने दिरंगाई न करता आरोग्य विभाग व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पावसाळ्यात होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी त्यांनी विधानसभेत केली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos