उशीर का झाला? असे विचारताच पत्नीने पतीवर लाकडी रापटीने हल्ला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : उशीर का झाला? अशी विचारणा केल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात लाकडी रापटीने मारहाण केल्याची घटना बल्लारपूर शहरातील सरदार पटेल वार्ड परिसरात घडली. या मारहाणीत पती जखमी झाला असून पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, रविकुमार प्रेमकुमार बोल्ली (वय 39) हे पत्नी सारिका बोल्ली व दोन मुलांसह सरदार पटेल वार्ड येथे वास्तव्यास आहेत. रविकुमार हे वेकोली येथे ठेकेदारीवर मजुरीचे काम करतात, तर पत्नी सारिका या अंबूजा फाउंडेशनमध्ये नर्सिंग विद्यार्थिनींना प्रशिक्षण देतात.
११ मे रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजताच्या सुमारास सारिका या ड्युटीवरून घरी परतल्यानंतर रविकुमार यांनी उशीर का झाला? अशी विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. घरगुती कारणांवरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर सारिका यांनी लाकडी रापटीने रविकुमार यांच्या डोक्यावर मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला जखम होऊन रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर जखमी रविकुमार यांनी बल्लारपूर पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी पत्नी सारिका रविकुमार बोल्ली यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१) अंतर्गत गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.
News - Chandrapur




Petrol Price




