चार वर्षांपूर्वीच्या जंगलातील खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

- २.५० लाखांच्या आर्थिक वादातून केला होता खून; जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : चार वर्षांपूर्वी अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लेंडेझरी-इटगाव जंगल परिसरात घडलेल्या खूनप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी संदेश राजेंद्र क्षीरसागर २४ वर्षे साईकृष्णा रेसिडेन्सी, नागपूर याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश भारती काळे यांनी २३ जुलै रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
या प्रकरणात अड्याळ पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १४०/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ४०४, भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४ व २५ तसेच मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
३० जून २०२२ रोजी लेंडेझरी-इटगाव जंगल परिसरात ही घटना घडली होती. मृत अनिकेत अजाबराव क्षीरसागर ४८ वर्षे नागपूर व आरोपी संदेश क्षीरसागर यांच्यात व्यावसायिक व्यवहारातून सुमारे २.५० लाख रुपयांचा आर्थिक वाद निर्माण झाला होता. या वादातून आरोपीने अनिकेत यांच्याविषयी मनात राग बाळगून त्यांचा खून करण्याचा कट रचला.
घटनेच्या दिवशी जंगल परिसरात जेवणासाठी बसलेल्या अनिकेत क्षीरसागर यांच्यावर आरोपीने सोबत आणलेल्या लोखंडी कोयत्याने मानेवर, खांद्यावर तसेच शरीराच्या इतर भागांवर सपासप वार केले. या अमानुष हल्ल्यात अनिकेत क्षीरसागर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तत्कालीन पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. तपासादरम्यान घटनास्थळावरील भौतिक पुरावे, साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल तसेच अन्य महत्त्वाचे पुरावे संकलित करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता आर. एन. खत्री यांनी प्रभावी युक्तिवाद केला. साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि इतर भक्कम परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपी संदेश राजेंद्र क्षीरसागर याला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरविले.
News - Bhandara




Petrol Price




