महत्वाच्या बातम्या

 कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ युवकांचे बल्लारपुरात उद्या धरणे आंदोलन


- पेपरफुटी, बेरोजगारी व शिक्षणाच्या खाजगीकरणाविरोधात उद्या एल्गार; केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिल्ली येथील जंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाला समर्थन दर्शविण्यासाठी बल्लारपूरातील युवकांनी २३ जून रोजी एकदिवसीय धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन होणार आहे.

स्पर्धा परीक्षा व विविध प्रवेश परीक्षांमधील वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटना, वाढती बेरोजगारी तसेच शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण याविरोधात आवाज उठविण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या आंदोलनाचे नेतृत्व रिंकेत सातपुते, कवल सोंडवले, दिलीप वर्मा, शुभम पगारे, करण सोमकुवर, ॲड. प्रियंका चव्हाण यांच्यासह करीत असून, विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

आयोजकांच्या मते, पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जात असून वाढती बेरोजगारी आणि शिक्षणाचे खाजगीकरण ही देशातील युवकांसमोरील गंभीर आव्हाने बनली आहेत. या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येणार असून युवकांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही आंदोलनातून केली जाणार आहे.

या आंदोलनात विद्यार्थी, पालक, युवक-युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos