दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : मुलाच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना मोटारसायकलचा तोल गेल्याने रस्त्यावर पडून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देवरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील टेकाबेदर गावाजवळ घडली. या प्रकरणी देवरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मृत महिलेचे नाव कलावती सुनील उईके ४५ वर्षे, रा. उशीखेडा, ता. सडक-अर्जुनी असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २४ दुपारी सुमारे ३.३० वाजताच्या सुमारास कलावती उईके या आपल्या मुलाच्या मोटारसायकलवर मागे बसून उशीखेडा गावाकडे जात होत्या. टेकाबेदर गावाजवळील वळणावर मोटारसायकलचा अचानक तोल गेल्याने त्या रस्त्यावर पडल्या. या अपघातात त्यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली.
घटनेनंतर त्यांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील एम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावत गेली आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची नोंद देवरी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली असून, अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास हवालदार ईस्कापे करीत आहेत.
News - Gondia




Petrol Price




