सरकारी ठेके व नोकरीचे आमिष दाखवून २२ लाखांची फसवणूक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सरकारी ठेके मिळवून देतो तसेच विविध शासकीय कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिघांकडून तब्बल २२ लाख रुपये उकळल्याप्रकरणी भद्रावती पोलिसांनी ७ मे रोजी एका व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रशांत राम पेटकुले (वय ३५), रा. संताजी नगर, भद्रावती) यांनी भद्रावती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, अजिंक्य देशपांडे यांच्या ओळखीने त्यांची भेट नितीन वसंतराव मते रा. खैरी, ता. खैरी, जि. यवतमाळ यांच्याशी झाली होती. नितीन मते यांनी गोंडपिपरी येथे रस्ता बांधकामाचे ठेकेदारीचे काम मिळवून देण्याचे आश्वासन देत ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार प्रशांत पेटकुले यांनी जानेवारी २०२१ व जानेवारी २०२२ मध्ये एकूण ७ लाख रुपये ऑनलाइन व्यवहाराद्वारे आरोपीच्या खात्यात जमा केले. मात्र त्यांना कोणतेही काम मिळाले नाही तसेच रक्कमही परत करण्यात आली नाही.
तसेच, पल्लवी अजिंक्य देशपांडे यांना पंचायत समितीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून आरोपीने ५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार २०२३ दरम्यान विविध तारखांना ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण ५ लाख रुपये आरोपीच्या खात्यात जमा करण्यात आले. मात्र नोकरी न लागल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले.
याचप्रमाणे, दुर्गा विठ्ठल उमाटे रा. ओंकार ले-आऊट, भद्रावती यांनाही त्यांच्या मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला ऑर्डनन्स फॅक्टरी, चंद्रपूर येथे नोकरीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर काटोल येथील अंध विद्यालयात लिपिक पदावर नियुक्ती मिळवून देतो असे सांगून आरोपीने १६ लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी ऑगस्ट ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान एकूण १० लाख रुपये आरोपीला देण्यात आले. नंतर आरोपीने नियुक्तीपत्र दिले, मात्र संबंधित शाळा २०१७ पासून बंद असल्याचे समोर आले.
या तिन्ही प्रकरणांमध्ये आरोपी नितीन मते याने सरकारी कामाचे ठेके व नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन करत एकूण २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी भद्रावती पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वीरेंद्र केदारे करीत आहेत.
News - Chandrapur




Petrol Price




