महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरच्या वाघ्या हळदीला जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न


- हळद उत्पादक शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा संवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : लभान सराड फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, खांबाडा (ता. वरोरा) यांच्या पुढाकाराने आयोजित हळद उत्पादक शेतकरी संवाद मेळाव्यास जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी शुक्रवारी 5 विशेष उपस्थिती दर्शवून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.

मेळाव्यात बोलताना जिल्हाधिकारी वसूमना पंत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पारंपरिक हळदीची वैशिष्ट्ये अधोरेखित केली. इतर हळदीच्या तुलनेत येथील हळदीमध्ये आढळणारे ७.५ ते ८ टक्के उच्च दर्जाचे कर्क्युमिन (Curcumin), उत्कृष्ट गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेतील मोठी संभाव्यता यामुळे या हळदीला स्वतंत्र ओळख मिळू शकते. याच अनुषंगाने चंद्रपूरच्या हळदीस भौगोलिक मानांकन (GI Tag) मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रक्रिया, कागदपत्रे, संशोधन, नमुना संकलन आणि संस्थात्मक प्रयत्न करण्यात येईल.

जिल्ह्यातील हळदीला वाघ्या हळद या नावाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र ओळख मिळवून देण्यासाठी प्रशासन सकारात्मक पावले उचलणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी हळद लागवड, पेरणी व्यवस्थापन, उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन तसेच विक्रीसंदर्भातील विविध समस्या व संधी यांवर शेतकऱ्यांच्या बांधावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शेतकऱ्यांशी थेट संवाद, त्यांच्या समस्यांचे प्रत्यक्ष आकलन आणि स्थानिक उत्पादनाला जागतिक ओळख मिळवून देण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरला. स्थानिक वाघ्या हळदीपासून जागतिक बाजारपेठेपर्यंत हा संकल्प साकार करण्यासाठी प्रशासन, एफपीसी आणि शेतकरी यांचे संयुक्त प्रयत्न पुढेही सुरू राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, नाबार्डचे महाव्यवस्थापक तृणाल फुलझेले, तहसीलदार योगेश कौटकर, प्रकल्प संचालक कुसळकर यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी, लभान सराड एफपीसीचे संचालक मंडळ, सदस्य तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने हळद उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

बोडखा आणि बारव्हा येथे कृषी उपक्रमांची पाहणी : जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मौजा बोडखा आणि आदर्श गाव बारव्हा येथे प्रत्यक्ष भेट देऊन शेतकरी, महिला बचत गट आणि कृषी उपक्रमांची पाहणी केली.

जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला व हळद लागवड आणि काढणीसाठी लागणारी आधुनिक यंत्रे व औजारे शेतकरी उत्पादक कंपनीला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यानंतर त्यांनी लभान सराड येथील शेतकरी उत्पादक कंपनीला भेट देऊन  बायोचार युनिट व गांडूळ खत युनिटची पाहणी केली. तसेच आदर्श गाव बारव्हा येथे भेट देऊन महिला बचत गट आणि शेतकऱ्यांशी चर्चा केली व कृषी प्रात्यक्षिकांची पाहणी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos