नागपूर एमआयडीसी : विषारी वायूने दोन कामगारांचा मृत्यू, तिसरा गंभीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बुटीबोरी एमआयडीसी येथील के-३ प्लॉटसमोरील सांडपाण्याच्या पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईचे काम करताना विषारी वायूमुळे दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजता घडली. मृतांमध्ये प्रशांत मनुजे आणि राहुल मडावी यांचा समावेश असून, तिसरा कामगार सुरेश पातेकर गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार गौरव पुरी यांच्या आदेशानुसार प्रशांत मनुजे, राहुल मडावी आणि सुरेश पातेकर हे बंद सांडपाणी पाइपलाइनच्या चेंबरमध्ये सफाईसाठी उतरले होते. मात्र त्यांना कोणतेही सुरक्षा उपाय किंवा संरक्षण साहित्य उपलब्ध करून न देता चेंबरमध्ये उतरविण्यात आले. सफाईदरम्यान सांडपाण्यातील रासायनिक घटकांमुळे निर्माण झालेल्या विषारी वायूमुळे तीनही कामगार गुदमरले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चेंबर उघडले आणि कामगारांना बाहेर काढले. तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या सुरेश पातेकर यांचा उपचार सुरू असून, प्रशांत मनुजे आणि राहुल मडावी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
या प्रकरणी एमआयडीसी बुटीबोरी पोलीस ठाण्यात कंत्राटदार गौरव पुरी यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम १०५ तसेच मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, कामगारांना कोणतेही सुरक्षा साधन न देता धोकादायक बंद चेंबरमध्ये काम करण्यास भाग पाडणे हा गुन्ह्याचा मुख्य आधार आहे. कंत्राटदार गौरव पुरी यांना ताब्यात घेण्यात आले असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
News - Nagpur




Petrol Price




