राज्य सरकार चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी सकारात्मक : आ. किशोर जोरगेवार
- ९० लक्ष रुपयांच्या विकासकामांचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : अपक्ष आमदार म्हणून चंद्रपूरकरांनी ऐतिहासिक मताधिक्याने निवडून दिले. मतदार संघाच्या विकासासाठी सत्ते सोबत राहणे गरजेचे होते. आता याचा विकासकामांच्या रूपाने मोठा फायदा होत आहे. मागील आठ दिवसात विविध विभागाच्या माध्यमातून १५ कोटी रुपयांचा निधी मतदार संघाच्या विकासाठी उपलब्ध केला असून राज्य सरकार चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी सकारात्मक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
रयतवारी कॉलनी आणि घुटकाळा वार्ड येथे ९० लक्ष रुपयांच्या विकासकामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, सामजिक कार्यकर्ता इंदुलता गुप्ता, अल्पसंख्याक विभागाचे युथ अध्यक्ष राशेद हुसेन, दीपक वर्मा, अजय मिस्त्री, नवशाद सीध्दिकी, विनोद गुप्ता, सुरेंद्र सोनकर, गोरेलाल केवट, सुलतान अली, चंद्रराज बातव, भोलाप्रसाद प्रजापती, रणजीत राजभर, रितेश सोनकर, अमोल वर्मा, जितेंद्र जयस्वाल, मायादिन रविदास आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर मतदारसंघातील विकासकामांना गती मिळाली आहे. शिंदे, फडणवीस सरकारच्या माध्यमातून चंद्रपूर मतदार संघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध होत आहे. बाबूपेठ येथील हिंग्लाज भवानी वार्डातील विकासासाठी आपण विशेष रस्ता निधी अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून येथे सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. तर शहरातील महत्वाच्या विकासकामांसाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजने अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून चंद्रपूर – नागपूर मार्गावर भव्य प्रवेशव्दार, प्रियदर्शनी चौक आणि जुना वरोरा नाका चौक येथे सौंदर्यीकरण आणि महाकाली पोलीस चौकी समोरील शहीद हेमंत करकरे चौक येथे सौंदर्यीकरण आदी कामे करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या दलित वस्ती सुधार निधी अंतर्गतही ५ कोटी रुपयांचा निधी मजूर झाला आहे. या निधीतून शहरातील अनेक विकास कामे केल्या जाणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
रयतवारी कॉलनी येथील सिमेंट कॉंक्रीट रोडचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली होती. या कामासाठी नगर विकास विभागाच्या मुलभूत सोई सुविधा निधी अंतर्गत ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देता आला याचा आनंद होत आहे. घुटकाळा येथे ही आपण ४० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून तेथील विकासकामाचे ही भूमिपूजन करण्यात आले असल्याचे ते यावेळी म्हणाले सदर भूमिपूजन कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
News - Chandrapur