महत्वाच्या बातम्या

 कुख्यात जगदीश गोखलेला गणेशपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या


- मकोकातील वॉन्टेड आरोपी डिलिव्हरी बॉयच्या वेशात फिरत होता; वाहनचोरीच्या तपासातून लागला छडा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / नागपूर : पाचपावलीतील बहुचर्चित शनिचरा बाजार गँगवॉर आणि गोळीबाराच्या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत फरार असलेल्या कुख्यात आरोपीला अखेर गणेशपेठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. वाहनचोरीच्या प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना जगदीश गोखले याचा ठावठिकाणा लागला. अजनी परिसरात सापळा रचून पोलिसांनी जगदीश गोखले याच्यासह त्याचा साथीदार ऋषभ कावडे याला अटक केली.

पोलिसांच्या कारवाईनंतर तपासात जगदीश गोखले हा पाचपावली परिसरातील शनिचरा बाजारात झालेल्या गँगवॉर आणि गोळीबाराच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचे समोर आले. या प्रकरणात पोलिसांनी जगदीशसह त्याच्या टोळीवर मकोका लावला होता. त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत फरार होता.

पोलिसांना गुंगारा देण्यासाठी डिलिव्हरी बॉयचा वेश -
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी जगदीश गोखले याने चक्क ऑनलाइन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा वेश धारण केल्याचे तपासात समोर आले आहे. संबंधित डिलिव्हरी एजंटसारखा पोशाख परिधान करून तो गणेशपेठ आणि आजूबाजूच्या परिसरात फिरत होता. या वेशाचा फायदा घेत परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्याबरोबरच तो वाहनांची रेकी करीत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

डिलिव्हरी बॉयच्या वेशात वावरताना परिसरातील कोणत्या ठिकाणी दुचाकी उभी असते, वाहनमालकांची ये-जा कशी असते आणि कोणती वाहने चोरीसाठी सहज लक्ष्य करता येतील, याची तो पाहणी करीत असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे मकोका प्रकरणात फरार असतानाच जगदीश वाहनचोरीच्या गुन्ह्यांतही सक्रिय असल्याचे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होत आहे.

वाहनचोरीच्या तपासातून लागला छडा -
गणेशपेठ परिसरात सातत्याने वाहनचोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी या प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास सुरू केला होता. वाहनचोरीच्या घटनांमागील आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना अजनी परिसरातील एका खोलीत चार संशयित व्यक्ती राहत असल्याची माहिती मिळाली.माहितीची खात्री करून गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने बुधवारी अजनी परिसरात सापळा रचला. परिसराची घेराबंदी करून संबंधित खोलीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत जगदीश गोखले आणि ऋषभ कावडे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी सुरू केली.

गणेशपेठ पोलिसांकडून जगदीशची तीन वाहनचोरीच्या प्रकरणांसह शनिचरा बाजारातील गँगवॉर आणि गोळीबाराच्या घटनेतील भूमिकेबाबत चौकशी केली जात आहे. वाहनचोरीच्या प्रकरणांत त्याचा सहभाग कितपत आहे, तसेच त्याच्या टोळीतील अन्य साथीदार कोण आहेत, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.

दीड महिन्यापासून पोलिसांना देत होता चकवा -
१५ जुलै रोजी कमाल चौकातील शनिचरा बाजार परिसरात वर्चस्वाच्या वादातून अजय चिंचखेडे आणि जगदीश गोखले यांच्या गटात संघर्ष झाला होता. सुरुवातीला झालेला वाद पुढे गँगवॉरमध्ये परिवर्तित झाला. याचदरम्यान बिट्टू चावडे या गुन्हेगाराने खुलेआम गोळीबार केल्याने शनिचरा बाजार परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेनंतर पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणातील अनेक आरोपींना अटक केली होती. मात्र, या प्रकरणातील प्रमुख आरोपी जगदीश गोखले पोलिसांच्या हाती लागत नव्हता. तो सातत्याने ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता.अखेर गणेशपेठ परिसरातील वाहनचोरीच्या तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीमुळे त्याचा ठावठिकाणा समोर आला. अजनी येथे रचलेल्या सापळ्यात तो अडकला आणि दीड महिन्यापासून फरार असलेल्या या मकोका आरोपीला पोलिसांनी अटक केली.

पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देणार -
जगदीश गोखलेची गणेशपेठ पोलिसांकडून वाहनचोरीच्या प्रकरणांत चौकशी सुरू असून, त्यानंतर शनिचरा बाजार गँगवॉर आणि गोळीबाराच्या प्रकरणातील पुढील तपासासाठी त्याला पाचपावली पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या कारवाईमुळे शनिचरा बाजार गँगवॉर प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधाला महत्त्वाचे यश मिळाले असून, जगदीशच्या चौकशीतून या टोळीच्या इतर हालचाली आणि गुन्हेगारी कारवायांबाबतही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos