महत्वाच्या बातम्या

 तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैभव कॉन्व्हेंट स्कूलची बाजी : विद्यार्थी, शिक्षिकेचा प्रथम क्रमांकावर ठसा!


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पंचायत समिती बल्लारपूरच्या वतीने स्थानिक भालेराव पब्लिक स्कूल येथे १३ ते १५ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ५४ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वैभव कॉन्व्हेंट स्कूल, बल्लारपूरने घवघवीत यश संपादन केले. या प्रदर्शनात शाळेच्या विद्यार्थ्याने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, तर शिक्षिका प्रणाली गोरघाटे आणि प्रयोगशाळा परिचर सृष्टी बेलखोडे यांनी सादर केलेल्या विज्ञान प्रतिकृतींना प्रथम क्रमांक मिळाला. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रचिती आली आहे.

या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील विविध शाळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. वैभव कॉन्व्हेंट स्कूलच्या वतीने विविध गटांत एकूण पाच विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या. यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्या कल्पकतेच्या, संशोधनवृत्तीच्या व नावीन्यपूर्ण विचारांच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी केली. उच्च प्राथमिक विद्यार्थी गटात इयत्ता सातवीचा विद्यार्थी देवेश दिलीप शेटे याने ‘स्मार्ट पार्किंग सिस्टीम’ ही विज्ञान प्रतिकृती सादर केली. या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक मिळाला. यासोबतच देवेशने विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून आपल्या बुद्धिमत्तेची आणि विज्ञान विषयातील ज्ञानाची चमक दाखवून दिली. त्याच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

माध्यमिक शिक्षक गटात शाळेच्या शिक्षिका प्रणाली गोरघाटे यांनी सादर केलेल्या क्युरिऑसिटी ऑफ सायन्स या विज्ञान प्रतिकृतीला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्यांच्या या यशाची दखल घेत त्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे. विज्ञानातील जिज्ञासा, सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण संकल्पना यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या प्रतिकृतीतून पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा परिचर गटात सृष्टी बेलखोडे यांनी तयार केलेल्या आरोग्य व स्वच्छता या विषयावरील विज्ञान प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला. या प्रतिकृतीच्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि सामाजिक जागरूकतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. त्यांच्या या यशाचेही सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे अध्यक्ष हेमंत मानकर, सचिव राजिया खान, मुख्याध्यापक विजय शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या फरजाना शेख व शबिस्ता सय्यद तसेच सर्व शिक्षकवृंदाने पुरस्कारप्राप्त विद्यार्थी, शिक्षिका आणि सहभागींचे अभिनंदन केले. त्यांच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक करून भविष्यातही विज्ञान व संशोधनाच्या क्षेत्रात अशीच उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले.





  Print






Related Photos