विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी छात्रों की गूंज युवा संमेलन : पेपरफुटी, बेरोजगारी व भरतीतील विलंबावर सरकारला धारेवर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : देशभरात वाढत्या पेपरफुटीच्या घटना, भरती प्रक्रियेमधील विलंब, वाढती बेरोजगारी आणि शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांविरोधात विद्यार्थ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी विद्यार्थी संघटना, चंद्रपूर यांच्या वतीने शनिवारी CDCC बँक हॉल येथे छात्रों की गूंज – युवांच्या समस्यांचे संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, पालक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
संमेलनात विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि रोजगार क्षेत्रातील विविध प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. NEET, UGC-NET, MPSC, SSC तसेच रेल्वे भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक वर्षे मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे परीक्षाप्रक्रियेवरील विश्वास कमी होत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
याशिवाय विविध शासकीय भरती प्रक्रियांमध्ये होणारा विलंब, निकाल जाहीर करण्यास लागणारा प्रदीर्घ कालावधी आणि नियुक्ती प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे युवकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. वाढती बेरोजगारी ही युवकांसमोरील गंभीर समस्या बनली असून, रोजगार निर्मितीसाठी शासनाने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
संमेलनात सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षा प्रणाली राबविणे, पेपरफुटी प्रकरणांतील दोषींवर कठोर कारवाई करणे, भरती प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रभावी करिअर मार्गदर्शन व्यवस्था निर्माण करणे, या मागण्यांवर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस निर्णय घ्यावेत, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे यांच्यासह दिलीप चौधरी, विनोद दत्तात्रय, शिवा राव, सचिन कत्याल, संतनू धोटे, यश दत्तात्रय, विनायक बागडे, सुभाष गौर, रामकृष्ण कोंड्रा, रमीज शेख, बंडू धोतरे, स्वप्नील कांबळे, मनीष तिवारी, राज यादव, अरुण धोटे, चंदाताई वैरागडे, कुंदाताई जेनेकर, नरेश मुंदडा, अभिषेक डोईफोडे यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा उमेदवार उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर शासनाने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली. युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी सर्वांनी एकत्रितपणे लढा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या समस्या केवळ चर्चेपुरत्या मर्यादित न ठेवता त्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
संमेलनादरम्यान विद्यार्थ्यांनी आमची परीक्षा सुरक्षित असावी, भरती प्रक्रिया पारदर्शक असावी आणि प्रत्येक युवकाला रोजगाराचा न्याय्य अधिकार मिळावा या प्रमुख मागण्यांसह जोरदार घोषणाबाजी केली. जब युवा जागेगा, तभी भविष्य बदलेगा या घोषवाक्याने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले.
विद्यार्थी संघटना, चंद्रपूर यांच्या पुढाकाराने आयोजित या संमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळाले असून, युवकांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीचा संदेश देण्यात आला. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन आवश्यक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा उपस्थित विद्यार्थ्यांनी आणि मान्यवरांनी व्यक्त केली.
News - Chandrapur




Petrol Price




