महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवरून अवैध वाहतुकीला ऊत : तुमसर मार्गे दूध, खवा, गुटखा, गांजा व गावठी दारूची कथित तस्करी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र–मध्यप्रदेश सीमेवर वसलेल्या तुमसर तालुक्यातून विविध वस्तूंच्या अवैध वाहतुकीचे जाळे दिवसेंदिवस अधिक मजबूत होत असल्याचे चित्र समोर येत आहे. मध्यप्रदेशातून दररोज मोठ्या प्रमाणात दूध, खवा, पनीर, प्रतिबंधित सुगंधित गुटखा, गांजा तसेच मोहफुलापासून तयार करण्यात येणारी गावठी दारू महाराष्ट्रात आणली जात असल्याची माहिती समोर येत असून, यामुळे सीमावर्ती भागातील तपासणी यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माहितीनुसार, मध्यप्रदेशातून दररोज मोठ्या प्रमाणात दूध रस्तेमार्गाने तुमसर तालुक्यात प्रवेश करत आहे. हे दूध पुढे नागपूर येथील दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करणाऱ्या विविध कारखान्यांकडे पाठविले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र, या दूध वाहतुकीसाठी आवश्यक परवानग्या, गुणवत्ता तपासणी, अन्नसुरक्षा नियमांचे पालन आणि संबंधित विभागांची देखरेख याबाबत कोणतीही अधिकृत व स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
तुमसर तालुका हा मध्यप्रदेशाच्या सीमेवर असल्याने येथे रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गांनी सहज संपर्क उपलब्ध आहे. या सुविधेचा गैरफायदा घेत काही तस्करांकडून प्रतिबंधित आणि बेकायदेशीर वस्तूंची वाहतूक केली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दूध व दुग्धजन्य पदार्थांसोबतच प्रतिबंधित सुगंधित गुटखा, गांजा आणि मोहफुलाची गावठी दारू यांची कथित तस्करीही याच मार्गाने होत असल्याचा आरोप केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागातील तपासणी नाके, संबंधित विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. नियमित तपासणी, प्रभावी नाकाबंदी आणि समन्वयाच्या अभावामुळेच अवैध वाहतुकीला चालना मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात होणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या वाहतुकीची वैधता, प्रतिबंधित पदार्थांच्या कथित तस्करीची सखोल चौकशी, संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे, अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता, त्यांची वाहतूक आणि साठवणूक याबाबतही शंका उपस्थित होत आहेत. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सीमावर्ती भागात विशेष तपासणी मोहीम राबवून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
News - Bhandara




Petrol Price




