महत्वाच्या बातम्या

 कापूस-सोयाबीन सावरले : धानपट्ट्यात अद्यापही चिंतेचे ढग


- जिल्हाभरात रिपरिप धरणाचे पाणी सोडूनही धान उत्पादक तालुक्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर पुनरागमन केले असून मंगळवारपासून सुरू झालेल्या संथ पण सातत्यपूर्ण रिपरिपीने खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी २२ रात्री झालेल्या पावसानंतर जिल्ह्याच्या विविध भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू असून, या पावसाचा सर्वाधिक फायदा सोयाबीन व कापूस पिकांना होत आहे. मात्र, धान उत्पादक पट्ट्यात अद्यापही रोवणीयोग्य पाऊस न झाल्याने भातशेतीची कामे ठप्प असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

जिल्ह्यातील कोरडवाहू व बागायती शेती असलेल्या चंद्रपूर, वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना, जिवती आणि गोंडपिपरी या तालुक्यांमध्ये सुरुवातीच्या पावसानंतर कापूस व सोयाबीनची पेरणी वेळेत पूर्ण झाली आहे. सध्या या दोन्ही पिकांची वाढ समाधानकारक होत असून, सतत पडणारा हलका पाऊस पिकांच्या वाढीस पोषक ठरत आहे. मुसळधार पाऊस नसला तरी जमिनीत ओलावा टिकून राहत असल्याने पिकांच्या मुळांची वाढ चांगली होत असून भविष्यातील उत्पादनासाठीही ही स्थिती लाभदायक मानली जात आहे.

दुसरीकडे, धान उत्पादक भागांतील परिस्थिती मात्र अद्यापही चिंताजनक आहे. सिंदेवाही, मूल, सावली, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, नागभीड आणि चिमूर या तालुक्यांमध्ये भात रोवणीसाठी आवश्यक असलेला दमदार पाऊस झालेला नाही. शेतांमध्ये पुरेसा चिखल तयार न झाल्याने रोवणीची कामे मोठ्या प्रमाणावर खोळंबली आहेत. त्यामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील भात लागवड अद्याप रखडलेली आहे.

भातशेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार गोसे खुर्द कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्याच्या पाण्याचा लाभ मर्यादित क्षेत्रालाच मिळत असल्याने बहुतांश शेतकरी अजूनही नैसर्गिक पावसावरच अवलंबून आहेत. कालव्याचे पाणी प्रत्येक शेतापर्यंत पोहोचत नसल्यामुळे रोवणीच्या कामांना अपेक्षित गती मिळू शकलेली नाही.

धान उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित वेळेत होणाऱ्या रोवणीवर अवलंबून असते. सध्या सुरू असलेली रिपरिप ओलावा टिकवून ठेवत असली तरी भातशेतीसाठी आवश्यक असलेला मुसळधार पाऊस अद्याप झालेला नाही. पुढील दोन ते तीन दिवसांत जोरदार पाऊस झाल्यासच रोवणीच्या कामांना वेग येईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, शिवारातील नाले, ओढे, शेततळी आणि अन्य लहान जलस्रोत अजूनही बहुतांश ठिकाणी कोरडेच आहेत. मागील दोन आठवड्यांच्या पावसाच्या खंडामुळे जलस्रोतांतील पाणीसाठा कमी झाला होता. सध्या सुरू असलेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी जलस्रोत भरण्यासाठी आवश्यक असलेला मुसळधार पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे भात लागवडीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नसल्याने धान उत्पादक शेतकऱ्यांची चिंता कायम आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, सध्या सुरू असलेला हलका व सातत्यपूर्ण पाऊस कापूस आणि सोयाबीनसाठी अत्यंत लाभदायक ठरत असला, तरी धान पिकासाठी पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची नितांत आवश्यकता आहे. अन्यथा रोवणीला आणखी विलंब होऊन.उत्पादनावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकूणच, जिल्ह्यातील खरीप हंगामात सध्या दोन वेगवेगळी चित्रे दिसून येत आहेत. एका बाजूला कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असताना, दुसऱ्या बाजूला धान उत्पादक तालुक्यांमध्ये अद्यापही चिंतेचे ढग कायम असून सर्वांच्या नजरा आता दमदार पावसाकडे लागल्या आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos