महत्वाच्या बातम्या

 मद्यधुंद ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे अंडे विक्रेता गंभीर जखमी : चालकाविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : दिलासाग्राम शाळेसमोरील मार्गावर झालेल्या गंभीर अपघातात अंडे विक्री व्यवसाय करणारे साईबाबा वॉर्ड येथील हरीदास जागोजी घरत हे गंभीर जखमी झाले असून, मद्यधुंद अवस्थेत ट्रक चालवून अपघात घडविल्याप्रकरणी ट्रक चालक शंकर परचाके रा. बाबुपेठ, चंद्रपूर याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, हरीदास घरत हे २२ जून रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आपल्या एमएच-३४ एडी-५२८१ क्रमांकाच्या दुचाकीने अंडे विक्रीसाठी बामणीकडे जात होते. त्यावेळी दिलासाग्राम शाळेसमोरील रस्त्यावरून एमएच-३४ बीजी-१३८२ क्रमांकाचा ट्रक जात होता. ट्रक चालक शंकर परचाके याने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकचा मागील भाग दुचाकीच्या हँडलला लागल्याने हरीदास घरत रस्त्यावर कोसळले.

अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. वैद्यकीय तपासणीत त्यांच्या डोक्यातील नस फाटल्याने मेंदूत रक्ताच्या दोन गाठी झाल्याचे तसेच उजव्या पायाच्या तळव्याला फ्रॅक्चर झाल्याचे निष्पन्न झाले. गंभीर दुखापतीमुळे ते अद्याप जबाब देण्याच्या स्थितीत नसल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी ट्रक चालकाची वैद्यकीय तपासणी केली असता तो मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले. जखमीचे भाऊ प्रकाश जागोजी घरत यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी ट्रक चालक शंकर परचाके याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, मद्यधुंद चालकांमुळे नागरिकांच्या जीवितास निर्माण होणाऱ्या धोक्याबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. प्रकरणाचा पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos