महत्वाच्या बातम्या

 संपत्तीच्या वादातून वृद्ध पित्याची निर्घृण हत्या : मुलगा व सुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा, आरोपी फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : संपत्तीच्या वादातून ६५ वर्षीय वृद्ध पित्याच्या डोक्यावर कपडे धुण्याच्या बॅटने प्राणघातक हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बल्लारपूर येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी मृताच्या मुलगा राजू काटीक आणि सून रवलिका राजू काटीक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मृतक उपेंद्र काटीक (वय अंदाजे ६५ वर्षे) हे बल्लारपूर येथील फुलसिंग नाईक वॉर्ड परिसरात वास्तव्यास होते. त्यांचा मोठा मुलगा रविंद्र उपेंद्र काटीक हा पत्नी व मुलांसह हैदराबाद येथे राहून सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. रविंद्र यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा धाकटा भाऊ राजू काटीक हा संपत्तीच्या कारणावरून आई-वडिलांशी वारंवार वाद घालत होता.

१० जून २०२६ रोजी रात्री उपेंद्र काटीक यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती रविंद्र काटीक यांना दूरध्वनीद्वारे मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे कळविण्यात आले. ही माहिती मिळताच रविंद्र काटीक हे हैदराबादहून नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पोहोचले. तेथे त्यांच्या वडिलांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली असून ते बेशुद्ध अवस्थेत असल्याचे दिसून आले.

तक्रारीनुसार, संपत्तीच्या वादातून राजू काटीक व त्याची पत्नी रवलिका यांनी उपेंद्र काटीक यांच्या डोक्यावर कपडे धुण्याच्या बॅटने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत त्यांना प्रथम बल्लारपूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.

उपचार सुरू असताना २४ जून २०२६ रोजी उपेंद्र काटीक यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर अजनी पोलिसांनी रुग्णालयात आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

या प्रकरणात सुरुवातीला वृद्ध व्यक्ती बाथरूममध्ये घसरून पडल्यामुळे जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र अंत्यसंस्कारानंतर रविंद्र काटीक यांनी बल्लारपूर पोलीस ठाण्यात हजर राहून सविस्तर तक्रार दाखल केली. संपत्तीच्या वादातूनच आपल्या वडिलांची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीच्या आधारे २६ जून रोजी बल्लारपूर पोलिसांनी राजू काटीक व रवलिका राजू काटीक यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दोन्ही आरोपी सध्या फरार झाले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे करीत असून आरोपींच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. वृद्ध पित्याच्या मृत्यूप्रकरणी मुलगा आणि सुनेवर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos