डुकराच्या शिकारीला गेलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू : एक जखमी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : डुकराच्या शिकारीसाठी गेलेल्या तिघा युवकांपैकी एका युवकाचा शेताभोवती लावण्यात आलेल्या वीज प्रवाहित तारेचा स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला. गुरुवारी रात्री सुमारे ११.३० वाजताच्या सुमारास वाघेडा शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत युवकाचे नाव विशाल पवार रा. समुद्रपूर असे असून, महेश राऊत हे जखमी झाले आहेत. रजनीकांत पवार हे तिसरे युवक या घटनेत बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल पवार, महेश राऊत आणि रजनीकांत पवार हे तिघे गुरुवारी सायंकाळी वाघेडा शिवारात डुकराच्या शिकारीसाठी गेले होते. त्याचवेळी शिवारातील एका शेतातून एक रानडुक्कर पळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याचा पाठलाग करत असताना ते पिकाच्या संरक्षणासाठी शेताभोवती लावण्यात आलेल्या वीज प्रवाहित तारेजवळ पोहोचले.
डुक्कर पकडण्याच्या प्रयत्नात विशाल पवार आणि महेश राऊत यांचा विजेच्या तारेस स्पर्श झाला. जोरदार विद्युत धक्का बसल्याने विशाल पवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर महेश राऊत जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार दीपक वानखेडे, डीबी पथकाचे प्रकाश मैद यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार दीपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे आणि डीबी पथकाचे प्रकाश मैद करीत आहेत.
तसेच शेताभोवती वीज प्रवाहित तार कोणी व कोणत्या परिस्थितीत लावली होती, याचाही तपास सुरू असून, संबंधितांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
News - Wardha




Petrol Price




