महत्वाच्या बातम्या

 विसापूरमध्ये अवैध दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा : दोघांविरुद्ध गुन्हा, ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : विसापूर येथील फुले चौक परिसरात सुरू असलेल्या अवैध देशी-विदेशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर बल्लारपूर पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह दारू विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य, नगदी रक्कम आणि इतर वस्तू असा एकूण ३१ हजार २६५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बल्लारपूर पोलीसांना विसापूर येथील फुले चौकातील एका पानठेल्यावर अवैधरित्या देशी व विदेशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार छापा टाकल्यानंतर पानठेल्यावर उपस्थित असलेल्या अशोक हरी वाढीले (वय ४२), रा. श्रीराम चौक, विसापूर याची चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी पानठेल्याची झडती घेतली असता फ्रिजमध्ये आणि काउंटरजवळ देशी दारूच्या बाटल्या, प्लास्टिक डिस्पोजेबल ग्लास, पाण्याचे कॅन, खुर्ची, यूपीआय व्यवहारासाठी वापरण्यात येणारे स्मार्ट स्पीकर तसेच दारू विक्रीतून मिळालेली नगदी रक्कम आढळून आली. या ठिकाणाहून सुमारे १२ हजार ८९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चौकशीदरम्यान वाढीले याने किशोर रामकृष्ण लभाने (वय ५३), रा. विसापूर याच्याकडे काम करत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी लभाने यांच्या घरावर धाड टाकली. घरातील स्वयंपाकघर व फ्रिजची झडती घेतली असता देशी दारूच्या प्लास्टिक पाऊचसह विदेशी बिअरच्या टिनबंद बाटल्या आढळून आल्या. या ठिकाणाहून १८ हजार ३७० रुपये किमतीचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.

तपासादरम्यान फुले चौकातील पानठेल्यावर ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी अशोक हरी वाढीले व किशोर रामकृष्ण लभाने यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई), ६८, ८३, ८६ व ९८(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोलीस कर्मचारी भास्कर चिंचवलकर, नासीर शेख, वैभव गाडगे, महेश कुकुडकर, लखन चव्हाण, सचिन राठोड तसेच विसापूर पोलीस चौकीच्या कर्मचाऱ्यांनी केली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos