महत्वाच्या बातम्या

 वर्धा नदीत दुहेरी शोकांतिका : अधिक मासातील स्नानासाठी गेलेल्याचा मृत्यू, बेपत्ता युवकाचा मृतदेहही सापडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वर्धा नदी परिसरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अधिक मासानिमित्त स्नानासाठी गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू झाल्यानंतर बेपत्ता असलेल्या युवकाचाही मृतदेह नदीपात्रात आढळून आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरा तालुक्यातील सास्ती येथील रमेश लटारू गिरसावळे (वय ४८) हे ८ जून रोजी सायंकाळी रामनगर घाटावर अधिक मासानिमित्त स्नान करण्यासाठी गेले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, धार्मिक श्रद्धेतून ते नदीवर गेले होते. मात्र अंघोळ करताना ते खोल पाण्यात गेल्याने बुडाल्याची घटना घडली. त्यानंतर सुरू असलेल्या शोध मोहिमेदरम्यान बुधवारी त्यांचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, बल्लारपूर शहरातील श्रीराम वॉर्ड येथील दिपेश विनोद कलकोटवार (वय ३२) हा युवक मंगळवारी रात्री सुमारे ९ ते ९.३० वाजताच्या दरम्यान घरून स्कूटी घेऊन बाहेर पडला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने वर्धा नदीत उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. चंद्रपूर येथील बचाव पथक व स्थानिक पोहणाऱ्यांकडून शोधमोहीम राबविण्यात आली.

अखेर बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास सास्ती पुलाखाली दिपेश कलकोटवार यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

अल्पावधीत घडलेल्या या दोन दुःखद घटनांमुळे बल्लारपूर व सास्ती परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos