अहेरी-हैदराबाद आंतरराज्यीय बस सेवेला ब्रेक लागण्याची शक्यता


- २० वर्षांपासून सुरू असलेली प्रवाशांची जीवनवाहिनी मंचेरियलपर्यंत मर्यादित करण्याचा प्रस्ताव
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : महाराष्ट्र आणि तेलंगणा (तत्कालीन आंध्र प्रदेश) या दोन राज्यांना जोडणारी अहेरी आगाराची बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय अहेरी-हैदराबाद आंतरराज्यीय बस सेवा बंद होण्याच्या मार्गावर असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. कमी उत्पन्न आणि अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ही बस थेट हैदराबादपर्यंत न चालवता केवळ तेलंगणातील मंचेरियलपर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे.
अहेरी आगाराची ही बस सेवा मागील २० वर्षांहून अधिक काळापासून अखंडपणे सुरू आहे. या सेवेमुळे दुर्गम भागातील नागरिकांना महाराष्ट्रातून थेट तेलंगणाच्या राजधानीपर्यंत पोहोचण्याची सुविधा मिळत होती. अहेरी येथून दररोज सायंकाळी ७ वाजता सुटणारी ही बस चंद्रपूर, मंचेरियल आणि करीमनगर मार्गे दुसऱ्या दिवशी सकाळी सुमारे ७ वाजता हैदराबाद येथे पोहोचत होती.
हैदराबादला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस अत्यंत सोयीची ठरत होती. रात्रीचा प्रवास करून सकाळी शहरात पोहोचल्यानंतर दिवसभर काम, वैद्यकीय उपचार, खरेदी किंवा इतर आवश्यक कामे पूर्ण करून प्रवासी पुन्हा परतीच्या बसने अहेरीकडे येत असत. त्यामुळे अहेरी, आलापल्ली, सिरोंचा आणि परिसरातील नागरिकांसाठी ही बस सेवा अत्यंत महत्त्वाची ठरली होती.
या बस सेवेमुळे महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ झाले होते. दोन्ही राज्यांतील रोटी-बेटीचे संबंध, व्यापार तसेच दैनंदिन व्यवहारासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात या बस सेवेचा वापर करत होते. मात्र, आता ही सेवा हैदराबादपर्यंत बंद करून मंचेरियलपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय झाल्यास प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूरसाठी रात्रीची शेवटची बसही होणार बंद -
अहेरीहून चंद्रपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठीही ही बस सेवा अत्यंत महत्त्वाची होती. सायंकाळी ७ वाजता सुटणारी अहेरी-हैदराबाद बस ही चंद्रपूरसाठी जाणारी एकमेव आणि शेवटची बस फेरी आहे. या बसनंतर रात्रीच्या वेळी चंद्रपूरकडे जाण्यासाठी कोणतीही पर्यायी बस उपलब्ध नसते.
त्यामुळे ही बस केवळ तेलंगणा राज्यात जाणाऱ्या प्रवाशांसाठीच नव्हे, तर चंद्रपूरकडे जाणाऱ्या स्थानिक प्रवाशांसाठीही जीवनवाहिनी ठरली होती. विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळत होता.
दरम्यान, एसटी महामंडळाने उत्पन्न आणि मनुष्यबळाच्या अडचणी लक्षात घेऊन हा प्रस्ताव पाठविला असला तरी, अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही महत्त्वाची आंतरराज्यीय बस सेवा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी अहेरी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




