महत्वाच्या बातम्या

 वरवट येथे गावठी दारूची हातभट्टी उद्ध्वस्त : १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीतील मौजा वरवट येथील जंगल परिसरात सुरू असलेला मोहा फुलाच्या गावठी दारूचा अवैध व्यवसाय पोलिसांनी उध्वस्त केला. या कारवाईत १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून धनराज धर्मदेव खोब्रागडे (रा. वरवट) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांना वरवट शेतशिवारातील नाल्यालगत हातभट्टी लावून मोहा फुलाची गावठी दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शनिवारी सकाळी छापा टाकला. यावेळी धनराज खोब्रागडे हा मोहा फुलाची गावठी दारू तयार करताना रंगेहाथ आढळून आला.

कारवाईदरम्यान पोलिसांनी १३ प्लास्टिक ड्रममध्ये भरलेला सुमारे ६५० किलो मोहा फुलाचा सडवा, ४९ लिटर गावठी दारू, दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी ड्रम, प्लास्टिक ड्रम, कॅन, टिनाचे पिपे, लाकडी चाटू तसेच प्लास्टिक पाईप असा एकूण १ लाख १५ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दुर्गापूर पोलीस ठाण्यात अप. क्र. २६०/२०२६ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ब), (क), (इ), (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहायक पोलीस अधीक्षक गौरव कायंदेपाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पंकज वासाडे, पोलीस अंमलदार संदीप, मंगेश शेंडे आणि रुपेश सावे यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos