महत्वाच्या बातम्या

 मुलमध्ये गोवंशीय मांस विक्रीवर पोलिसांचा छापा : एक आरोपी अटकेत, दुसरा फरार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मुल येथील इंदिरानगर परिसरात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मुल पोलिसांनी धडक कारवाई करत एकास ताब्यात घेतले असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. या कारवाईत गोवंशीय मांसासह कत्तल व विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण २६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार, १७ जून रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता वार्ड क्रमांक ११, इंदिरानगर येथील एका घरात अवैधरित्या गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी छापा टाकला.

घरझडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात गोवंशीय मांस तसेच कत्तल आणि मांस विक्रीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी तात्काळ मुद्देमाल जप्त करून कारवाई केली.

या प्रकरणात आरोपी शहबाज मुस्ताक कुरेशी याला अटक केले असून, अल्ताफ कुरेशी (वय ४२), रा. इंदिरानगर, वार्ड क्र. ११, मुल हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारित) अधिनियम १९९५ मधील कलम ५(ब), ५(क), ९, ९(अ), प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(एल) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली मुल पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय राठोड यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक रुपेश कुंभरे, पोहवा भोजराज मुंडरे, पोअं नरेश कोडापे, संदीप चुधरी, शंकर बोरसरे यांनी केले.

गोवंशीय जनावरांची अवैध कत्तल आणि मांस विक्रीविरोधात करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे. प्रकरणाचा पुढील तपास मुल पोलीस करीत आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos