बेस्टच्या ८६८ भाडेतत्त्वावरील बस नादुरुस्त : प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


- समितीत संताप; बेजबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, कंत्राटदारांवरील दंडाचा हिशेबही मागितला
विदर्भ न्यूज एक्सरेस
वृत्तसंस्था / मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या भाडेतत्त्वावरील बसच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, बेस्टच्या २,५५३ भाडेतत्त्वावरील बसपैकी तब्बल ८६८ बस नादुरुस्त असल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत समोर आली. उद्धवसेनेचे बेस्ट समिती सदस्य नितीन नांदगावकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत नादुरुस्त बसमुळे प्रवासी तसेच पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याचा आरोप केला. वारंवार होणाऱ्या अपघातांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
बैठकीत बेस्ट समिती सदस्य अजय सिंह यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून मानखुर्द येथील बस अपघाताचा संदर्भ देत प्रशासनाला धारेवर धरले. भाडेतत्त्वावरील बसच्या देखभालीत होत असलेल्या त्रुटींमुळे अपघातांची मालिका सुरू असल्याचे सांगत, कंत्राटी बसची नियमित तपासणी, दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी थेट बेस्टच्या अभियांत्रिकी विभागाकडे सोपविण्याची मागणी त्यांनी केली.
सात महिन्यांत अनेक अपघात; कारवाईबाबत प्रश्नचिन्ह -
गेल्या सात महिन्यांत भाडेतत्त्वावरील बसचे अनेक अपघात घडले असून, त्यामध्ये काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर नितीन नांदगावकर यांनी २१ एप्रिल रोजी प्रशासनाला या विषयाची आठवण करून दिली होती. मात्र, जवळपास तीन महिन्यांनंतर केवळ लेखी उत्तर देण्यात आले असून, या संदर्भात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही किंवा झालेल्या बैठकींच्या नोंदी समितीसमोर सादर करण्यात आल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. वारंवार घडणाऱ्या अपघातांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नादुरुस्त बसवर दंडाची तरतूद; वसुलीचा तपशील मागितला -
भाडेतत्त्वावरील बस नादुरुस्त झाल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंड आकारण्याची तरतूद असूनही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला. कंत्राटानुसार एखादी बस बंद पडल्यास संबंधित कंत्राटदारावर प्रति बस प्रतिदिन पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. गेल्या तीन महिन्यांत अशा प्रकारे किती दंड वसूल करण्यात आला, याची सविस्तर माहिती सभागृहासमोर सादर करण्याची मागणी नांदगावकर यांनी केली.
एसी कार्यालयात बसू नका; रस्त्यावर उतरून बस तपासा -
बस अपघातांच्या वाढत्या घटनांवर बेस्ट समितीच्या अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी वातानुकूलित कार्यालयांत बसून अहवालांवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बसची तपासणी करावी, बसची तांत्रिक स्थिती नियमित तपासावी आणि अपघात रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.
९४ बसच्या दुरुस्तीचे काम सुरू; प्रशासनाचा दावा -
बैठकीत उपस्थित प्रश्नांना उत्तर देताना बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बहुतांश बसमधील किरकोळ तांत्रिक दोष दूर करण्यात आल्याचे सांगितले. नादुरुस्त म्हणून नोंद असलेल्या ८६८ बसांपैकी केवळ ९४ बसच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू असून, उर्वरित बस दुरुस्त करून पुन्हा सेवेत दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
मात्र, प्रशासनाच्या या स्पष्टीकरणाने समिती सदस्यांचे समाधान झाले नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्नांमध्ये कोणतीही तडजोड न करता बसच्या देखभालीसाठी अधिक कठोर, पारदर्शक आणि जबाबदार यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. तसेच वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
News - Rajy




Petrol Price




