महत्वाच्या बातम्या

 मुख्य सचिव राजेश अग्रवाल व पोलीस महासंचालक सदानंद दाते यांचा आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी संवाद


- पुनर्वसन निधी, शिलाई मशीन, स्प्रे पंप व विविध योजनांचा लाभ वितरित; आत्मसमर्पितांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद जवळपास संपुष्टात आला असून जिल्ह्यातील नागरिक आता माओवादी दहशतीपासून मुक्त होत आहेत. शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणामुळे हिंसाचाराचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात सहभागी झालेल्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या पुनर्वसनाला अधिक बळ देण्यासाठी नवजीवन वसाहत, नवेगाव (गडचिरोली) येथे विशेष संवाद व साहित्य वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रक्रियेचा आढावा घेतला.

८१९ माओवादी सदस्यांनी केले आत्मसमर्पण -
सन २००५ पासून राज्य शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून अनेक वरिष्ठ व जहाल माओवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी पुनर्वसन उपक्रमांमुळे आजपर्यंत एकूण ८१९ माओवादी सदस्यांनी आत्मसमर्पण केले असून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

विकासाच्या नव्या पर्वाकडे गडचिरोली -
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार ३१ मार्च २०२६ पर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी प्रभाव जवळपास संपुष्टात आल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील विकासकामांवर विशेष भर देण्यास सुरुवात केली आहे. या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि इतर वरिष्ठ अधिकारी ६ व ७ जून रोजी गडचिरोली दौऱ्यावर आले होते.

या दौऱ्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात मुख्य सचिवांनी आत्मसमर्पित माओवादी सदस्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी, पुनर्वसनाशी संबंधित गरजा आणि शासनाच्या योजनांबाबत सविस्तर चर्चा केली.

पुनर्वसन निधीचे धनादेश आणि साहित्यांचे वाटप -
कार्यक्रमादरम्यान आत्मसमर्पित माओवादी सदस्यांना केंद्र व राज्य शासनाच्या पुनर्वसन योजनांअंतर्गत आर्थिक सहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. तसेच स्वावलंबनासाठी आवश्यक विविध साहित्यांचेही वितरण करण्यात आले.

महिला बचत गटातील सदस्यांना शिलाई मशीन, पुरुष लाभार्थ्यांना स्प्रे पंप, तसेच ई-श्रम कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर योजनांशी संबंधित कागदपत्रे देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना वाहन चालक परवाने देखील वितरित करण्यात आले.

अशोक मासा होळी दाम्पत्याचा विशेष सत्कार -
कार्यक्रमातील एक विशेष क्षण म्हणजे आत्मसमर्पित माओवादी सदस्य अशोक मासा होळी यांच्या कुटुंबाचा करण्यात आलेला गौरव. गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून त्यांच्यावर यशस्वी नसबंदी उघडण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अपत्यप्राप्ती झाल्याने त्या दाम्पत्याचा मान्यवरांच्या हस्ते विविध संसारोपयोगी भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

आत्मसमर्पितांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध -
यावेळी बोलताना मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आत्मसमर्पित सदस्यांना शासनाच्या विविध पुनर्वसन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊन स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य शासनाकडून करण्यात येईल. आत्मसमर्पितांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.

तसेच गडचिरोली पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन उपक्रमांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन समाजात सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले.

हिंसाचार सोडून विकासाचा मार्ग स्वीकारणाऱ्यांचे कौतुक -
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास आणि प्रगतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या आत्मसमर्पित माओवादी सदस्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सर्व आत्मसमर्पितांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत नव्या आयुष्यात यशस्वी होण्याचा विश्वास व्यक्त केला.

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता -
कार्यक्रमाची सांगता आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या मुलांनी राष्ट्रगीत सादर करून केली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मुलांच्या सादरीकरणाचे कौतुक करत त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मान्यवरांची उपस्थिती -
कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त शिरीष जैन, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, अपर विभागीय आयुक्त माधवी खोडे-चवरे, आदिवासी विकास आयुक्त लीना बनसोड, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक योगेशकुमार गुप्ता, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. तसेच गोंदियाचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम -
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आत्मसमर्पण शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पिवाल, पोलीस उपनिरीक्षक संतोष कोळी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

गडचिरोली जिल्ह्यात शांतता, विकास आणि सामाजिक पुनर्वसनाच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांना या कार्यक्रमाने नवी दिशा दिली असून आत्मसमर्पित माओवादी सदस्यांच्या नवजीवनाला शासन आणि पोलीस प्रशासनाच्या ठोस पाठबळाची पुन्हा एकदा प्रचिती मिळाली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos