हत्तीच्या हल्ल्यात सेल्फीचा मोह ठरला जीवघेणा : गडचिरोलीतील चांदाळा जंगलात इसमाचा दुर्दैवी मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : वन्यप्राण्यांसोबत सेल्फी काढण्याचा वाढता मोह पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे. गडचिरोली शहरालगतच्या चांदाळा जंगल परिसरात रानटी हत्तीच्या अत्यंत जवळ जाऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा हत्तीच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. धनराज पुंजीराम मडावी (रा. मेंढा, चांदाळा) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चांदाळा जंगल परिसरात रानटी हत्ती दिसत असल्याची माहिती मिळताच अनेक नागरिक त्याला पाहण्यासाठी आणि मोबाईलवर छायाचित्रे टिपण्यासाठी घटनास्थळी पोहोचले होते. याचवेळी धनराज मडावी यांनी हत्तीच्या अगदी जवळ जाऊन सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्तीने अचानक आक्रमक होत त्यांच्यावर हल्ला चढविला. या भीषण हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.
या दुर्दैवी घटनेनंतर वन विभागाने नागरिकांना पुन्हा एकदा सावधगिरीचा इशारा दिला आहे. रानटी हत्ती किंवा इतर कोणत्याही वन्यप्राण्यांच्या जवळ जाणे, त्यांच्यासोबत सेल्फी किंवा छायाचित्रे काढण्याचा प्रयत्न करणे जीवघेणे ठरू शकते, असे विभागाने स्पष्ट केले. वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर राखावे, त्यांना कोणत्याही प्रकारे चिथावणी देऊ नये तसेच प्रशासन आणि वन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वनक्षेत्रात उत्सुकतेपोटी किंवा सोशल मीडियासाठी धोकादायक कृत्ये टाळणे हीच स्वतःच्या सुरक्षेची सर्वात मोठी जबाबदारी असल्याचेही वन विभागाने अधोरेखित केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




