खेमजई ग्रामस्थांतर्फे भास्करराव पेरे पाटील यांचा ग्रामगीता देऊन नागरी सत्कार


- आदर्श ग्रामविकासासाठी स्वच्छता, शेती व संस्कारांवर भर देण्याचे पेरे पाटलांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : तालुक्यातील खेमजई येथे पाटोदा छत्रपती संभाजीनगर चे ख्यातनाम आदर्श सरपंच भास्करराव पाटील पेरे यांच्या विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ग्रामीण विकासातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल खेमजई ग्रामस्थांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रामगीता भेट देऊन त्यांचा भावुक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रमोद गंपावर हे होते. तर मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच मनीषा चौधरी, माजी उपसरपंच चंद्रहास मोरे, गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक वसंतदादा निखाडे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सतीश अघडते आणि गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष शत्रुघ्न शेरकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना भास्करराव पेरे पाटील यांनी आदर्श ग्रामविकासाची संकल्पना ग्रामस्थांसमोर मांडली. गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर केवळ पायाभूत सुविधा पुरेशा नसून, वृद्धांची काळजी घेणे, पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, आधुनिक शेती आणि मुलांवरील उत्तम संस्कार यांवर ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले. तसेच खेमजई गावात राबवल्या जाणाऱ्या सीताफळ लागवडीच्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपसरपंच चंद्रहास मोरे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रदीप ढोके यांनी केले, तर आभार रमेश चौधरी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सचिव मेघश्याम येंचलवार, विनायक बावणे, प्रमोद गायकवाड, रमेश बावणे, शंकर धोत्रे, शत्रुघ्न शेरकुरे, नत्थूजी घरत, सुरेश तपासे, रवींद्र चौधरी, संजय शेरकुरे व तुळशीराम ताजणे यांनी परिश्रम घेतले. या सोहळ्याला स्थानिक शाळेचे विद्यार्थी, सर्व शिक्षक तसेच खेमजई व परिसरातील ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Petrol Price




