महत्वाच्या बातम्या

 विना परवाना प्रवासी वाहतूक व करचुकवेगिरी करणाऱ्या वाहनांवर परिवहन विभागाचा दणका


- १४८ वाहनांची तपासणी; ३७ वाहनांवर कारवाई, ८ वाहने अटकाव; १ लाख ७८हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विना परवाना प्रवासी वाहतूक करणाऱ्या, महाराष्ट्र शासनाचा मोटार वाहन कर चुकविणाऱ्या तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांविरोधात परिवहन विभागाने विशेष धडक मोहीम राबवून कारवाई केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि वाहतूक व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन विभागाच्या पथकाने विविध ठिकाणी वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली.

अवैध प्रवासी वाहतुकीवर विशेष लक्ष -
या विशेष मोहिमेदरम्यान खाजगी बसेस, काळी-पिवळी टॅक्सी तसेच इतर खासगी वाहनांमधून करण्यात येणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात अनधिकृतपणे थांबणाऱ्या वाहनांचीही तपासणी करण्यात आली.

तपासणी करताना वाहनांचे परवाने, मोटार वाहन कर, विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची बारकाईने पडताळणी करण्यात आली. कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

३७ वाहनांवर कारवाई; ८ वाहने अटकाव -
परिवहन विभागाच्या या मोहिमेत एकूण १४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, गंभीर स्वरूपाच्या नियमभंगामुळे ८ वाहनांना अटकाव करण्यात आला. या कारवाईतून एकूण १ लाख ७८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन -
परिवहन विभागाने सर्व वाहनमालक आणि चालकांना वाहने चालविताना आवश्यक कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे आवाहन केले आहे. वैध वाहन परवाना, मोटार वाहन कर, विमा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) तसेच इतर आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.

अवैध प्रवासी वाहतूक, वेगाने वाहन चालविणे आणि करचुकवेगिरी यामुळे अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशा प्रकारच्या धडक कारवाया आगामी काळातही सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos