गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या एस.एस.सी. परीक्षा २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून गोंडवाना सैनिकी विद्यालयाने यंदाही आपल्या उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यालयातील एकूण विद्यार्थ्यांपैकी ६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करून प्राविण्य श्रेणीत स्थान मिळविले आहे. तसेच ११ विद्यार्थ्यांनी ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले असून ८ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण संपादन केले आहेत. इतर सर्व विद्यार्थीही ७० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील कॅडेट मास्टर कृष्णा सोमेश्वर आंबोरकर याने ९५ टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम क्रमांक पटकाविला असून जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तसेच कॅडेट मास्टर काव्य रविंद्र जुमनाके याने ९०.४० टक्के गुण मिळवून विद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. कॅडेट मास्टर विश्वजित राकेश साखलवार व नरेंद्र नितीन नखाते यांनी प्रत्येकी ९०.२० टक्के गुण मिळवत संयुक्तरीत्या तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच कॅडेट मास्टर परिमल गुरुदेव वडस्कर व नमन परशुराम गेडाम यांनी ९० टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेचे सचिव धर्मरावबाबा आत्राम, संस्थेच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकवृंदाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




