महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर पोलिसांनी शोधले ११८ हरविलेले मोबाईल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने तांत्रिक तपासाच्या आधारे उल्लेखनीय कामगिरी करत मागील वर्षभरात जिल्ह्यातून हरविलेले तब्बल ११८ मोबाईल संच शोधून काढण्यात यश मिळविले आहे. केंद्र सरकारच्या CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली असून हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल संचांची एकूण अंदाजे किंमत १२ लाख ६३ हजार ९२० रुपये इतकी आहे.

शोधून काढलेले मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र नागपूर संदीप पाटील यांच्या हस्ते मोबाईल धारकांना त्यांचे मोबाईल सुपूर्द करण्यात आले. हरविलेला मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी चंद्रपूर पोलीस दलाचे आभार मानले.

पोलीस दलाने यावेळी मोबाईलचे आधुनिक जीवनातील वाढते महत्त्व अधोरेखित केले. आज मोबाईल हा केवळ संवादाचे साधन नसून बँकिंग, डिजिटल व्यवहार, डिजी लॉकरमधील कागदपत्रे, शैक्षणिक माहिती, व्यवसाय आणि वैयक्तिक आठवणी यांचे प्रमुख माध्यम बनले आहे. मोबाईल हरवल्यास आर्थिक व्यवहार, संपर्क आणि महत्त्वाचा डेटा गमावण्याची शक्यता निर्माण होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोबाईलची किंमत कमी-अधिक असली तरी त्यामधील डेटा मालकासाठी अत्यंत मौल्यवान असतो. याच संवेदनशीलतेतून चंद्रपूर पोलीसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करून नागरिकांचे डिजिटल आयुष्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, नागरिकांनी मोबाईल खरेदी करताना आणि वापरताना खबरदारी घ्यावी, असे आवाहनही पोलीस दलाने केले आहे. सेकंड हँड मोबाईल खरेदी करताना मूळ बिल तपासावे, IMEI क्रमांक नोंदवून ठेवावा तसेच मोबाईल हरवल्यास त्वरित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून CEIR पोर्टलवर मोबाईल ब्लॉक करावा, असे सांगण्यात आले.

तसेच हरविलेला किंवा चोरीचा मोबाईल स्वतःकडे ठेवणे अथवा वापरणे हे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३१४ अंतर्गत गुन्हा असून त्यासाठी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद असल्याची माहिती पोलीसांनी दिली.

मोबाईल सुरक्षिततेसाठी नागरिकांनी मजबूत पासवर्ड, पॅटर्न लॉक किंवा बायोमेट्रिक सुरक्षा वापरावी तसेच Google Drive किंवा iCloud वर नियमित डेटा बॅकअप घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos