जनजातीय गौरव दिन सोहळ्यात आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची उपस्थिती : भगवान बिरसा मुंडा यांना अभिवादन


- गडचिरोलीला देशाची स्टील सिटी बनविण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी जननायक आणि महान क्रांतिकारक धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथे आयोजित जनजातीय गौरव दिन सोहळ्यात गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित राहून भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाइन सहभागात तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी समाजाचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि परंपरा जतन करण्यासोबतच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे अधोरेखित केले. तसेच गडचिरोली जिल्ह्याला देशाची स्टील सिट बनविण्याचा संकल्प व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील नैसर्गिक साधनसंपत्ती, औद्योगिक क्षमता आणि विकासाच्या संधी लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेला हा संकल्प जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या सोहळ्याला केंद्रीय मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (ऑनलाइन), केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, मंत्री डॉ. अशोक उईके, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार माया इवनाते, खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी मंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम, माजी पालकमंत्री अंब्रिशराजे आत्राम, नगराध्यक्षा ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह विविध मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि जनजातीय समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या त्याग, संघर्ष आणि स्वाभिमानाच्या विचारांचे स्मरण करून आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा संदेश या जनजातीय गौरव दिन सोहळ्यातून देण्यात आला.




Petrol Price




