महत्वाच्या बातम्या

 रत्नापुर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिंदेवाही तालुक्यातील रत्नापुर येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत परिसर अधिक हरित आणि स्वच्छ करण्याच्या उद्देशाने विविध प्रकारच्या २० वृक्षांची लागवड करण्यात आली.

सध्या वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि बदलते हवामान यामुळे पर्यावरणाचे संतुलन धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी शाळेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.

शाळेच्या परिसरात लावण्यात आलेल्या वृक्षांमध्ये सावली देणारे तसेच पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश होता. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी वृक्षांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याची शपथ घेतली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला बालाजी लेंजे, शाळेचे मुख्याध्यापक दिनकर गायकवाड, शिक्षक विकास राजुरकर, मिथुन रामटेके, सोमेश्वर आत्राम, अंकुश गजबे, मंगेश बन्सोड, तसेच सचिन ढोणे, शितल कापगते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जनजागृती निर्माण होत असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos