विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
- सिंदेवाही शहरात ३५ कोटिंच्या विकास कामांची लोकार्पण व भूमिपूजन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : जनतेने मला सेवा करण्याकरिता लोकप्रतिनिधित्वाची संधी दिली. नागरिकांच्या या आशावादी विश्वासाला मी कदापिही तडा न जाऊ देता सदैव जनतेच्या सेवेकरिता अधिक तत्परतेने कार्य करेन. नागरिकांच्या मूलभूत सुविधांसह इतर सोयी सुविधांसाठी शासन स्तरावरून आवश्यक तेवढा निधी खेचून आणून माझ्या विकास संकल्पनेतून सिंदेवाही शहराचा चेहरा मोहरा बदलविणार, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते सिंदेवाही लोनवाही नगरपंचायत द्वारे आयोजित शहरातील ३५ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
आयोजित कार्यक्रमास गडचिरोली काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हसन गिलानी, सिंदेवाही तालुका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रघुनाथ शेंडे, चंद्रशेखर चन्ने, बाबुराव गेडाम, हरि बारेकर, डॉ. केशव शेंडे, सुदाम खोब्रागडे, तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनील उटलवार, वीरेंद्र जयस्वाल, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मयूर सुचक, राहुल पोरेडीवार, श्रावण नागदेवते, महिला तालुका काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, शहराध्यक्ष प्रीती सागरे तथा सर्व विभागाचे प्रशासकीय अधिकारी काँग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी उपयुक्त असा संदेश दिला. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट मौलिक असे संविधान रुपी भेट दिली. देशात धर्मांधता पसरवून मनुवादी विचारसरणीने देश गुलामगिरी च्या वाटेवर आणून ठेवला असून देशाचे संविधान व लोकशाही टिकवण्यासाठी आता सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी नगर बौद्ध समाजातर्फे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचा सत्कार करण्यात आला.
पार पडलेल्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात सिंदेवाही तहसील कार्यालय इमारतिचे लोकार्पण (१५ कोटी), तालुका क्रीडा संकुल येथे विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन(८कोटी ), ई लायब्ररीचे भूमिपूजन (४.५ कोटी ), शहरातील प्रभागनिहाय रस्ते बांधकामा करिता (३ कोटी), शहरातील दीक्षाभूमी समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सौंदर्यीकरनाचे भूमिपूजन (१ कोटी), सिंदेवाही- किन्ही मुख्य मार्गावरील उंच फुल बांधकामाची भूमिपूजन (३.५ कोटी) आदी विकास कामांचा समावेश आहे. तर शहरातील मुख्य सिमेंट मार्गावरील अंडरग्राउंड विद्युत पुरवठा करणे करिता ५ कोटी, शहराला असोलमेंढा येथून पाणीपुरवठा करण्याकरिता ७० कोटी, सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा देऊन ५० खाटांचे अद्यावत रुग्णालय बांधकाम करणे करिता ५० कोटी, तसेच सिंदेवाही- पाथरी सदर मार्गावरी ल रेल्वे क्रॉसिंग वर उडान पूल बांधकामा करिता ९० कोटी, शिवाजी चौक सौंदर्य करण्यासाठी २ कोटी, एवढा प्रचंड विकास निधी विरोधी पक्षनेते विजय यांच्या आता प्रयत्नातून मंजूर झाला असून लवकरच ही विकास कामे सुरू होईल, अशी माहिती आपल्या प्रास्ताविकातून नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी दिली.
याप्रसंगी काँग्रेसचे ज्येष्ठ बाबुराव गेडाम व तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रमाकांत लोधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युनुस शेख, प्रास्ताविक नगराध्यक्ष स्वप्निल कावळे यांनी केले. आयोजित कार्यक्रमास शहरातील बहुसंख्य नागरिक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
News - Chandrapur