महत्वाच्या बातम्या

 आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याला मोठे यश : तडाळी ग्रोथ सेंटर व चंद्रपूर एमआयडीसीसाठी ४० कोटींच्या निधीची घोषणा


- गडचिरोलीतील शेतकऱ्यांशी संवाद साधणार; उद्योगांवरील श्वेतपत्रिका सादर करण्याचेही उद्योगमंत्र्यांचे विधानसभेत आश्वासन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, १९६१ मधील सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विधानसभेत प्रभावीपणे उपस्थित केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी ४० कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. तसेच गडचिरोलीतील औद्योगिक प्रकल्पांबाबत शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी विशेष बैठक घेण्याबरोबरच राज्यातील औद्योगिक विकासावर विभागनिहाय श्वेतपत्रिका सादर करण्याचेही आश्वासन दिले.

विधानसभेतील चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसी येथे रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, वीजपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सुमारे ८० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्यामुळे उद्योगविकासावर परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले आणि तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली.

राज्याच्या विकासासाठी घेतल्या जाणाऱ्या कर्जात विदर्भाचाही समान वाटा असल्याने चंद्रपूर, गडचिरोली, हिंगणघाट आणि इतर मागास भागांनाही औद्योगिक विकासाचा समान लाभ मिळाला पाहिजे, असे सांगत आ. मुनगंटीवार यांनी विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.

यावेळी त्यांनी राज्यातील औद्योगिक विकासाचा वस्तुनिष्ठ आढावा जनतेसमोर यावा, यासाठी विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सर्व विभागांतील उद्योग, गुंतवणूक, सामंजस्य करार (एमओयू), प्रत्यक्ष सुरू झालेले प्रकल्प आणि रोजगारनिर्मितीचा तपशील असलेली विभागनिहाय श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणीही केली.

गडचिरोलीमध्ये प्रस्तावित मोठ्या औद्योगिक प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना स्थानिक शेतकऱ्यांशी विश्वासाने संवाद साधणे अत्यावश्यक असल्याचे सांगत आ. मुनगंटीवार यांनी विकास आणि लोकविश्वास यांचा समतोल राखण्याची गरज अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या भावना, अपेक्षा आणि मागण्यांचा आदर करूनच औद्योगिक विकासाची प्रक्रिया पुढे नेली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आ. मुनगंटीवार यांच्या या सर्व मुद्द्यांची दखल घेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभागृहात महत्त्वपूर्ण आश्वासने दिली. तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसीच्या पायाभूत सुविधांसाठी मागणी करण्यात आलेल्या निधीपैकी ४० कोटी रुपये तातडीने उपलब्ध करून दिले जातील, असे त्यांनी जाहीर केले.

याशिवाय गडचिरोलीतील औद्योगिक प्रकल्पांच्या अनुषंगाने स्थानिक शेतकरी, संबंधित शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत विशेष बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनाही सहभागी करून घेत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल आणि त्यांच्या भावना व सूचना जाणून घेतल्या जातील, अशी ग्वाही उद्योगमंत्र्यांनी दिली.

तसेच पुढील अधिवेशनापूर्वी राज्यातील उद्योग, सामंजस्य करार, प्रत्यक्ष कार्यान्वित झालेले प्रकल्प, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीचा विभागनिहाय तपशील असलेली श्वेतपत्रिका सभागृहात सादर करण्यात येईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी पाठपुराव्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला महत्त्वाची चालना मिळाली असून, तडाळी ग्रोथ सेंटर आणि चंद्रपूर एमआयडीसीमधील पायाभूत सुविधा उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचबरोबर गडचिरोलीतील औद्योगिक प्रकल्पांबाबत स्थानिक शेतकऱ्यांशी विश्वासपूर्वक संवाद साधण्याचा निर्णय आणि राज्याच्या औद्योगिक विकासावर श्वेतपत्रिका सादर करण्याची घोषणा या दोन्ही बाबी भविष्यातील औद्योगिक धोरणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.





  Print






News - Rajy




Related Photos