शेतकऱ्यांनी ओलीतासाठी पाणी मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कार नदी प्रकल्पाच्या समादेश क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी जलाशयातील उपलब्ध साठ्यातील पाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी पाणी मागणी अर्ज नमुना ७ मध्ये भरुन दोन प्रतीत दि.30 ऑक्टोंबर पर्यंत कार नदी प्रकल्प, उपविभाग कारंजा येथे सादर करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांनी केले आहे. पाणी मागणी अर्ज करतांना शेतकरी स्वत: शेताचा मालक असला पाहिजे. कुळ अगर वाहितदार असलेल्या शेतीसाठी मागणी अर्जाबरोबर मालकाचे संमतीपत्र जोडावे. अर्जामध्ये मागणीचे क्षेत्र पिकवार स्पष्ट करावे.पाणी अर्जावर सर्वे नंबर, पोटहिस्से, नहर कुलाबा, पाट बरोबर नोंदवावे व स्वाक्षरी करुन साक्ष नोंदवावी. मागणी अर्जाची पुर्तता संबंधित शाखा अभियंता कडून करुन घ्यावी व पूर्ण स्वरुपात भरलेला अर्ज दाखल करावा. पाणी पुरवठा रब्बी हंगामात दि.१५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत जलाशयातील पाणीसाठा उपलब्धतेनुसार करण्यात येईल. रब्बी पुर्वी अथवा नंतर पाणी पुरवठा पाहिजे असल्यास त्यासाठी वेगळा अर्ज करावा लागणार आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार व पुरेशा मागणी नुसार अशा अर्जाचा विचार केला जाईल.
News - Wardha