जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांच्या मतदानाची तारीख जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणुका पुढे ढकलता येणार नाहीत, असं स्पष्ट केल्यानंतर या निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता होती. त्यात न्यायालयाने ४८ तासांमध्ये तारीख जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर कोणत्याही क्षणी ही घोषणा होण्याची शक्यता होती. त्यानंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातली घोषणा केली असून पुढील महिन्यात मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ६ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या ५ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी हे मतदान घेतले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर या निवडणुका घेतल्या जाणार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकांच्या घोषणा प्रलंबित होत्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांच्या तारखा अखेर न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. एकीकडे राजकीय नेतेमंडळींनी आरक्षणाचा वाद आणि करोना या पार्श्वभूमीवर योग्य तो आढावा घेऊनच यासंदर्भातला निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका आधी घेतलेली असताना आता न्यायालयाच्या निर्देशांनुसारच निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता सत्ताधारी आणि राजकीय वर्तुळातून काय भूमिका घेतली जाईल, याची चर्चा सुरू झाली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2021-09-13


Related Photos