चिमूर येथे राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमाचा थाटात समारोप


- अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी) चिमूर अंतर्गत येत असलेल्या १६१ अंगणवाडी केंद्रातील सेविका आणि मदतनीसांच्या उपस्थितीत ९ व्या राष्ट्रीय पोषण माहचा समारोपीय कार्यक्रम स्थानिक शेतकरी भवनात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चिमुरचे गट विकास अधिकारी सुभाष बांदुरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) प्रकाश भांदककर, मुख्यसेविका डॉ. अंजली ठेंगे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनपर सत्रात मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यात प्रामुख्याने राष्ट्रीय पोषण माहचे उद्दिष्ट, बालकांचे आरोग्य, पौष्टिक आहाराचे महत्त्व, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना व लेक लाडकी योजना या शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अंगणवाडी केंद्रासमोरील अडचणी आणि या कामात लोकसहभागाचे असणारे महत्त्व या विषयांचा समावेश होता.
पोषक आहार पाककृती स्पर्धा व राज्यस्तरासाठी निवड : यापूर्वी सर्कल स्तरावर पोषक आहार पाककृती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांची व इतर उत्कृष्ट पाककृतींची अंतिम स्पर्धा घेण्यात आली. यात ३५ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मान्यवर व परिक्षकांनी या सर्व पाककृतींची बारकाईने पाहणी केली. यामधून निवडलेले प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी आता राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविले जाणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमांतून जनजागृती : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये पथनाट्य, नकला, समूहगीत गायन, वैयक्तिक गीत गायन, समूह नृत्य आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा होत्या. या स्पर्धात्मक सादरीकरणाच्या माध्यमातून पोषण माह, बेटी बचाओ-बेटी पढाओ, आरोग्य व पोषण, आणि जंक फूडचे शरीरावर होणारे दुष्परिणाम या अत्यंत संवेदनशील व महत्त्वाच्या विषयांवर समाजप्रबोधन करण्यात आले.
तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या मनिषा देठे, पॅरामेडिकल स्टॉफ प्रतिभा मडावी, कल्पना फुलझेले यांनी चाइल्ड लाईन, वन स्टॉप सेंटर, बाल सरंक्षण व बाल संगोपन योजनेची माहिती दिली.




Petrol Price




