ट्रक सोडवून देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २७.५२ लाखांची फसवणूक

- बँकेकडून ट्रक सोडवून घेतल्यानंतर स्वतःच्या व्यवसायासाठी वापरल्याचा आरोप; शांतिनगर पोलिसांत गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : बँकेने जप्त केलेला ट्रक आर्थिक तडजोड करून सोडवून देण्याचे आमिष दाखवत एका ज्येष्ठ नागरिकाची २७ लाख ५२ हजार ५४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतिनगर पोलिसांनी मानेवाडा येथील आकाश बोस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
व्हीएचबी कॉलनी येथील कैलास रामअवतार यादव ६३ वर्षे यांचा एमएच ४९ एटी २७७० क्रमांकाचा ट्रक इन्सॉल्व्हन्सी फायनान्स बँकेने थकबाकीमुळे जप्त करून सील केला होता. या परिस्थितीचा फायदा घेत मानेवाडा येथील आकाश बोस याने यादव यांच्याशी संपर्क साधला. बँकेसोबत आर्थिक तडजोड करून ट्रक सोडवून देण्याचे आश्वासन त्याने यादव यांना दिले.
बोस याच्या आश्वासनावर विश्वास ठेवून यादव यांनी फायनान्स कंपनीचे देणे चुकते करण्यासाठी त्याला २० लाख रुपये रोख दिले. या रकमेतून बोस याने बँकेकडून ट्रक सोडवून घेतला. मात्र, ट्रक यादव यांच्या स्वाधीन करण्याऐवजी त्याचा वापर स्वतःच्या व्यावसायिक कामासाठी सुरू केला, असा आरोप आहे.
अनेक वर्षे ट्रकचा वापर करूनही बोस याने यादव यांना कोणतेही भाडे किंवा आर्थिक मोबदला दिला नाही. तसेच ट्रकही परत केला नाही. यादव यांनी वारंवार ट्रक परत करण्याची मागणी केली; मात्र त्यांना ट्रक मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शांतिनगर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आकाश बोस याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.




Petrol Price




