महत्वाच्या बातम्या

 पिकाला पाणी देण्यासाठी गेले अन् काळाने घात केला; विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : दुष्काळाच्या सावटात भातपीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना ३ ऑक्टोबर रोजी मूल तालुक्यातील केळझर येथे घडली. प्रकाश कोटरंगे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

भातपीक हातचे जाऊ नये, काही प्रमाणात तरी पीक वाचावे, यासाठी प्रकाश कोटरंगे हे ३ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे पत्नी माधुरी प्रकाश कोटरंगे यांना चिंता वाटू लागली. त्यांनी शेताकडे जाऊन प्रकाश यांचा शोध घेतला.

शेतात पोहोचताच प्रकाश हे जमिनीवर पडलेल्या अवस्थेत दिसून आले. हे दृश्य पाहून माधुरी यांनी आरडाओरड करून शेजारील शेतकऱ्यांना मदतीसाठी बोलावले. आवाज ऐकताच परिसरातील शेतकरी घटनास्थळी धावून आले. प्राथमिक माहितीनुसार, शेतातील वीजप्रवाह असलेल्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्याने प्रकाश यांना विजेचा धक्का बसला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी तसेच मूल पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. प्रकाश यांच्या मृत्यूचे नेमके कारण वैद्यकीय तपासणी आणि पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दुष्काळाच्या संकटात पिकाला वाचविण्यासाठी शेतात गेलेल्या प्रकाश यांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने केळझर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक बहीण असा परिवार आहे. कोटरंगे कुटुंबावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, शेतातील विद्युत वाहिन्या, खांब आणि विद्युत जोडण्यांची तपासणी करून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.





  Print






Related Photos