शेतकरी मित्र म्हणून सहभाग घेण्यासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अंतर्गत कृषि विभागाच्या विविध कृषि विषयक योजना, आधुनिक तंत्रज्ञान, पीक उत्पादनातील सुधारण तसेच शेतकऱ्यांपर्यंत कृषि विषयक माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रगतीशील व कृषि क्षेत्रात सक्रीय असलेल्या व्यक्तींची शेतकरी मित्र म्हणून निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकरी मित्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, नैसर्गिक व सेंद्रिय शेती, पीक संरक्षण, मृदा व जलसंधारण तसेच कृषि विभागाच्या विविध उपक्रमाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. शेतकरी मित्र हा कृषि विभाग आणि शेतकरी यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून कार्य करेल. गावातील शेतकऱ्यांना कृषि विषयक मार्गदर्शन व माहिती उलब्ध करुन देणे, कृषि विभागाच्या उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांचा सहभाग वाढविणे तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी संबंधित कृषि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे ही शेतकरी मित्राची प्रमुख भुमिका राहणार आहे.
शेतकरी मित्र निवडीसाठी शेतकरी मित्राचे २५ वर्षे ते ६० वर्ष असावे, शेतकरी मित्र हा संबंधीत सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी शेतकरी असावा. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा. त्याचे शिक्षण किमान १२ पास असणे आवश्यक आहे. त्याच्याकडे समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे. इच्छुकांनी गावातील सहाय्यक कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आत्माच्या प्रकल्प संचालकांनी कळविले आहे.




Petrol Price




