महत्वाच्या बातम्या

 जिमलगट्टात चितळाची शिकार : तीन आरोपी वनविभागाच्या ताब्यात


- सुधागुडम येथे धडक कारवाई; १५ किलो मांसासह शिकारीचे साहित्य जप्त, आरोपींना न्यायालयात हजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस घरात साठवून ठेवल्याचा गंभीर प्रकार जिमलगट्टा वनपरिक्षेत्रांतर्गत सुधागुडम येथे उघडकीस आला आहे. वनविभागाच्या पथकाने ५ नोव्हेंबर रोजी धडक कारवाई करत चितळाचे अंदाजे १५ किलो मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य जप्त केले. या प्रकरणी तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरातील अवैध वन्यजीव शिकारीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.

सुधागुडम येथील नियतक्षेत्र उमनूर-१ परिसरात काही व्यक्तींनी चितळाची शिकार करून त्याचे मांस घरात लपवून ठेवल्याची गोपनीय माहिती वनविभागाला मिळाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वनविभागाच्या पथकाने तातडीने संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी घराची कसून तपासणी केली असता चितळाचे अंदाजे १५ किलो मांस आणि शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आढळून आले. वनविभागाने सदर मांस व साहित्य जप्त करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली.

या प्रकरणात व्यंकटस्वामी रामुल बेडकी, लक्ष्मण किस्टय्या कावरे आणि सत्यम राजाराम भगत (तिघेही रा. सुधागुडम) यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे. वनविभागाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, ५ नोव्हेंबर रोजी त्यांना अहेरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.

पंचांसमक्ष जप्त मांसाची विल्हेवाट -
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले चितळाचे मांस खराब होण्याच्या स्थितीत असल्याने त्याची कायदेशीर प्रक्रियेनुसार विल्हेवाट लावण्यात आली. ६ नोव्हेंबर रोजी पंचांच्या उपस्थितीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून हे मांस जमिनीत सुरक्षितपणे पुरण्यात आले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी आणि उपविभागीय वनाधिकारी विष्णुवर्धन रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी ओ. बी. लोहकरे आणि एफडीसीएमचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन वाघमोडे यांच्या नेतृत्वात वनविभागाच्या पथकाने ही मोहीम राबविली.

या कारवाईत वनपाल डी. यू. राठोड, पी. टी. दहागांवकर, एस. एम. मुसळे, के. बी. भांगे, के. वाय. भांगे, एस. बी. चिट्टीवार, अमोल सोनवणे, सचिन गाडेकर, जे. बी. नरोटे, एल. बी. वेलादी, आर. सी. धुर्वा आणि पी. एस. तुलावी यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

वन्यजीवांची शिकार व त्यांच्या अवयवांची किंवा मांसाची साठवणूक करणे हा वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने गंभीर प्रकार असून, अशा घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाकडून गस्त व कारवाई अधिक तीव्र करण्याची गरज व्यक्त होत आहे. सुधागुडम येथील या कारवाईमुळे अवैध वन्यजीव शिकारीविरोधात वनविभागाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.





  Print






Related Photos