महत्वाच्या बातम्या

 भक्तीचा गजर, संगीताचा ठेका अन् रोषणाईचा झगमगाट! अहेरीत दुर्गादेवी विसर्जनाचा जल्लोष


- आ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी विराजमान दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप

- आमदारांसह कुटुंबीयांनीही धरला गाण्यांवर ठेका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : भक्तीमय वातावरण… वाजंत्रीचा निनाद… पारंपरिक नृत्यांचा ठेका… विविध संगीताची धूम आणि आकर्षक रोषणाईचा झगमगाट! अशा उत्साहपूर्ण वातावरणात माजी मंत्री तथा आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या दुर्गादेवीला मोठ्या जल्लोषात निरोप देण्यात आला. भक्ती आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळालेल्या या विसर्जन सोहळ्याने अहेरीकरांचे लक्ष वेधून घेतले.

आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी दरवर्षी दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जाते. नवरात्रोत्सवादरम्यान विधिवत पूजाअर्चा, आराधना आणि भक्तिमय वातावरणात देवीची सेवा केल्यानंतर यंदाही मोठ्या उत्साहात विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. वाजंत्रीचा गजर, पारंपरिक नृत्यांची रंगत आणि विविध गाण्यांच्या तालावर थिरकणारे भक्त यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता.

या सोहळ्यात आकर्षक रोषणाई आणि दमदार संगीत विशेष आकर्षण ठरले. रोषणाईने उजळलेला परिसर, संगीताच्या तालावर रंगलेला जल्लोष आणि पारंपरिक नृत्यांनी विसर्जन मिरवणुकीत वेगळीच रंगत आणली. देवीच्या निरोपासाठी जमलेल्या अहेरीकरांसह पाहुणेमंडळीही या उत्सवी वातावरणात सहभागी झाली.विशेष म्हणजे, या जल्लोषात आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांनीही कुटुंबीयांसह विविध गाण्यांच्या तालावर ठेका धरला. आमदार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून उपस्थितांमध्येही उत्साह संचारला.

भक्तीमय वातावरणात सुरू झालेला हा सोहळा संगीत, नृत्य आणि जल्लोषाने अधिकच रंगतदार झाला. एकंदरीत, अहेरीतील दसरा उत्सव आणि दुर्गादेवी विसर्जन सोहळ्याने यंदा भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा सुंदर मिलाफ घडवून आणला. भक्तीचा गजर, संगीताचा निनाद आणि रोषणाईचा झगमगाट यामुळे अहेरीतील विसर्जन सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.





  Print






Related Photos