महत्वाच्या बातम्या

 गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात पोलिसांचा भव्य रूट मार्च


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चंद्रपूर पोलिसांकडून शनिवारी दि १२ सप्टेंबर रोजी चंद्रापूर दशहरातून भव्य रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सवादरम्यान मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस विभागाने बंदोबस्ताची संपूर्ण तयारी केली आहे.

पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सायंकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस ठाणे चंद्रपूर शहर येथून सुरू झालेला मार्च गांधी चौक, जटपुरा गेट, दवा बाजार मार्गे केवलराम चौक येथे समाप्त झाला.

रूट मार्चमध्ये चंद्रपूर शहर, रामनगर आणि दुर्गापूर पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व कर्मचारी, स्थानिक शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, दोषसिद्धी शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, दहशतवाद विरोधी पथक तसेच एसआरपीएफ ग्रुप क्रमांक १७ चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी आणि गणेशोत्सवासाठी तैनात गृहसैनिक सहभागी झाले होते. एकूण ३३ अधिकारी, २५५ पोलीस अंमलदार, एक क्यूआरटी पथक आणि ९४ गृहसैनिक या रूट मार्चमध्ये सहभागी झाले.

यावेळी सीसीटीव्ही व्हॅन, दंगा नियंत्रण पथकाचे वाहन, पेट्रोलिंग वाहन, वाहतूक वाहन, मार्शल वाहन तसेच डायल-११२ वाहनांचा समावेश होता. पोलीस अधिकारी व अंमलदारांनी लाठी, हेल्मेट तसेच दंगा नियंत्रणाचे साहित्य सोबत घेतले होते. अश्रुधुराच्या साधनांसह पोलिसांची सज्जता यावेळी दिसून आली.

रूट मार्चच्या माध्यमातून सोशल मीडिया वापराबाबत, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांपासून दूर राहण्याबाबत तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

गणेशोत्सवादरम्यान सोशल मीडियावर चुकीची किंवा अफवा पसरविणारी माहिती प्रसारित करू नये, कोणत्याही जाती-धर्माबद्दल आक्षेपार्ह अथवा चुकीचे वक्तव्य करू नये आणि जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य टाळावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच वाहतुकीचे नियम पाळून प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे, प्लाझ्मा आणि लेजर लाईटचा वापर टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी मिरवणुकीदरम्यान जनजागृतीपर बॅनर व होर्डिंग लावून सामाजिक संदेश देण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.





  Print






Related Photos