महत्वाच्या बातम्या

 शेतात फवारणी करताना सर्पदंश : तरुण शेतमजुराचा मृत्यू


- उपचारादरम्यान भंडारा जिल्हा रुग्णालयात प्राण गमावले; पत्नी, दोन चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : शेतामध्ये औषधांची फवारणी करण्यासाठी गेलेल्या ३३ वर्षीय तरुण शेतमजुराचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पवनी तालुक्यातील वाही येथील शेतशिवारात घडली. चंद्रशेखर मुर्लीधर घुगूसकर ३३ वर्षे असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे घुगूसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चंद्रशेखर घुगूसकर हे १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास वाही येथील शेतशिवारात औषधांची फवारणी करण्यासाठी गेले होते. शेतात फवारणीचे काम सुरू असताना अचानक सापाने त्यांना दंश केला. सर्पदंश झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पवनी येथे दाखल केले.

मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी रात्री भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबावर अकाली संकट -
चंद्रशेखर घुगूसकर यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने पत्नी व दोन चिमुकल्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शेतात काम करताना सर्पदंशाच्या घटना घडत असल्याने शेतकरी व शेतमजुरांनी फवारणी तसेच अन्य शेतीची कामे करताना विशेष खबरदारी घेण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घुगूसकर कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला.





  Print






Related Photos